समुद्राची पातळी वाढत असल्याने 2050 पर्यंत मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती
समुद्राच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेता, येत्या 2050 पर्यंत मुंबई शहर पाण्याखाली जाण्याची भीती आहे. न्यू जर्सीतील क्लायमेट सेंटर या संस्थेच्या रिसर्चमध्ये ही माहिती उघड झाली आहे.
मुंबई : समुद्राची पातळी वाढत असल्याने 2050 पर्यंत जगातील काही महत्त्वाची शहरे समुद्राच्या पोटात जाण्याची शक्यता आहे. न्यू जर्सीतील क्लायमेट सेंटर या संस्थेनं एक शोधनिबंध सादर केला ज्यात ही धक्कादायक गोष्टी समोर आली आहे. जवळपास समुद्राच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या 150 मिलियन लोकांना याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत.
समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने सर्वात जास्त नुकसान दक्षिण व्हिएतनामचं होणार आहे. 20 मिलियन लोक सध्या जलमय होणाऱ्या भागात राहात आहेत. व्हिएतनामच्या एकूण लोकसंख्येपैकी ही एक चतुर्थांश इतकी लोकसंख्या आहे. हो ची मिंच ही व्हिएतनामची आर्थिक राजधानी आहे. ज्याचं सर्वाधिक नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अख्ख्या जगातल्या पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेलं बँकॉक शहरही अडचणीत आहे. 2050 पर्यंत बँकॉक समुद्राच्या पोटात जाण्याची भीती आहे. तर थायलंडच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोकांना याचा फटका बसेल. चीनमधील शांघाय हे आशियातल्या आर्थिक गाड्याचं इंजिन मानलं जातं. पण 2050 पर्यंत शांघायचा बहुतेक भागही समुद्राच्या पाण्यात असेल.
मुंबई शहरही बुडण्याची शक्यता
भारताची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहरल सुद्धा समुद्राच्या पोटात जाण्याची भीती आहे. 7 बेटांचं शहर असलेल्या मुंबईतील भविष्यातील कुलाबा हे विरारचा भाग होईल. म्हणजे मुंबई आणि तिची महत्त्वाची उपनगरं समुद्राच्या पोटात असतील. त्यामुळे भविष्यात सुरक्षित अशी नवी शहरं वसवण्यावर भर द्यावा लागेल.
शिवाय 2050 चा विचार केला तर नैसर्गिक संकट आपल्यापासून केवळ 25-30 वर्षंच दूर आहे. त्यामुळे धोकादायक अशा शहरांमधील लोकांना इतरत्र स्थलांतरीत करण्यावर भर द्यावा लागणार आहे. पण त्यासाठी वातावरणात वेगानं होणारे बदल आपल्याला लोकांना पटवून द्यावे लागतील.