मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, घरातील 3 मुले जखमी; भिंत कोसळून एकाचा मृत्यू
महिल्या मजल्यावरील स्लॅब मध्यरात्री कोसळल्याने कुटुंबातील 3 मुले जखमी झाली होती. त्यांच्या डोक्यातून रक्तश्राव देखील होत होता.

मुंबई : राजधानी मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तर, काही ठिकाणी जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटनाही घडली आहे. मुंबईतील (Mumbai) अंधेरी पश्चिम येथील डी.एन. नगर पोलीस अधिकारी वसाहतीत इमारत क्रमांक 8 मधील रूम नं.145 (पहिला मजला) येथे रविवारी पहाटे 2 वाजता स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत तीन लहान मुले जखमी झाली आहेत. त्यामुळे या पोलीस अधिकारी वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इमारतीच्या महिल्या मजल्यावरील स्लॅब मध्यरात्री कोसळल्याने कुटुंबातील 3 मुले जखमी झाली होती. त्यांच्या डोक्यातून रक्तश्राव देखील होत होता. आता, या कोसळलेल्या घरातील पोलीस अधिकाऱ्यांनी ही रूम खाली करून भाड्याच्या घरात जाणे पसंत केले आहे. या घटनेतील गंभीर बाब म्हणजे, यापूर्वी देखील या वसाहतीत स्लॅब कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून अधिकारी वर्गाने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली होती. तरीसुद्धा संबंधित विभागाने दुरुस्ती व देखभाल कार्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा जीवितास धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिक व पोलीस कर्मचारी वर्ग यांच्यात तीव्र नाराजी असून, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ढिलाईमुळे घडणाऱ्या या अपघातासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. जर, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची ही गत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
भिंत कोसळून एकाचा मृत्यू
मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाणे अंतर्गत हैदराबाद स्टेट येथील संरक्षण भिंत पावसामुळे आज कोसळल्याची घटना घडली. आज सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास ही भिंत कोसळ्याची घटना घडली. या दुर्घटनेत सतीश निरके (वय.३५ वर्ष) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सतिश यांच्या अंगावर भींत पडल्याने जखमी सतीश निरके यांना नायर रुग्णालय मुंबई येथे उपचारासाठी घेऊन जाण्यास आले होते. मात्र, तेथे त्यांना रुग्णालय प्रशासनाने मृत घोषित केले. दरम्यान, आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा
पावसाचा जोर उद्याही कायम राहणार; मुंबईसह 4 जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
वर्ध्यात हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा, गावात अन् शहरातही नाव; काँग्रेस नेत्यानं पुढे आणली यादी























