ED On Sanjay Raut in High Court : प्रवीण राऊत यांच्याविरोधातील आरोपपत्रातून राऊत अँड राऊत कंपनीच्या व्यवहारांवर सवाल करण्यात आले आहेत.
By : अमेय राणे, एबीपी माझा | Edited By: निलेश झालटे | Updated at : 09 Apr 2022 12:34 PM (IST)
ED On Sanjay Raut in High Court
ED On Sanjay Raut in High Court : शिवसेना खासदार संजय राऊतयांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नुकत्याच जप्त केलेल्या मालमत्ता या आर्थिक घोटाळ्यातून जमवलेल्या काळ्या पैशातून खरेदी केलेल्या आहेत, असा आरोप ईडीनं प्रवीण राऊत यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रातून केला आहे. ईडीनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत विरोधात नुकतंच मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हे पहिलंच आरोपपत्र आहे. प्रवीण राऊत यांच्या कागदपत्रांच्या झाडाझडतीत वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांनी भागीदारीत अलिबागमध्ये अनेक जागा विकत घेतल्याची कागदपत्र सापडली. ज्यातील काही मालमत्ता जप्त केल्याची माहिती तपासयंत्रणेकडून देण्यात आली आहे.
राऊत अँड राऊत कंपनीच्या व्यवहारांवर सवाल
अवनी इंफ्रास्ट्रक्चर्स या कंपनीत संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत या भागीदार आहेत. या कंपनीनं इतर भागीदारांसोबत मुंबईतील सांताक्रुझ इथं टुलिप रेसिडेंसी नावाची एक इमारत उभारलीय. ज्यात वर्षा राऊत यांची गुंतवणूक 5 हजार 625 रूपये इतकी दाखवण्यात आलीय. तर माधुरी राऊत यांची गुंतवणूक 13 लाख 5 हजार रूपये इतकी दाखवण्यात आलीय. मात्र या प्रकल्पातून दोघींना प्रत्येकी 14 लाख रूपये नफा झाल्याची नोंद कशी? असा सवाल विचारण्यात आला आहे. याशिवाय पालघरमधील एका भूखंडाच्या व्यवहारातून प्रवीण राऊतला मिळालेले 45 कोटी आणि साल 2008 ते 2010 या वर्षात वाधवान यांच्या एचडीआयएल कडून अनेक हफ्त्यांत आलेले 112 कोटी कसले?, याचा उत्तरही प्रवीण राऊत देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे गोरेगावच्या पत्रा चाळ प्रकल्पातून आलेले 50 कोटी ही तर केवळ या भ्रष्टाचाराच्या तपासातील सुरूवात होती, असा दावा ईडीनं या आरोपपत्रातून केला आहे.
पत्रा चाळ घोटाळा
पत्रा चाळ प्रकल्पातून म्हाडाकडनं मिळालेला एफएसआय विकून मनी लाँड्रींग करण्याच्या हेतूनच प्रवीण राऊत यांनी हे सारे घोटाळे केल्याचा तपासयंत्रणेचा आरोप आहे. प्रवीण राऊत आणि वाधवान यांनी गुरू आशिष आणि एचडीआयएलच्या माध्यमातून 1 हजार 34 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे, ज्याची चौकशी सध्या ईडीमार्फत सुरू आहे. या पुनर्विकास प्रकल्पात घर गमावलेल्या 672 लोकांना घर देण्याचा यांचा कधीही हेतूच नव्हता असं प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याची माहिती ईडीनं दिली आहे. गुरू आशिषच्या माध्यमातून प्रवीण राऊत एफएसआय लाटण्याच्या हेतूनच बांधकामाची जागा 1 लाख 66 चौ.मी. वरून वाढवत 1 लाख 94 चौ.मी. दाखवली. त्यावेळी पत्रा चाळ मालक आणि जागेचे मालक असलेलं म्हाडा यांनी लोखंडवालासोबत पुनर्विकासाचा करार केला होता, जो कालांतरानं फिस्कटला. त्यानंतर निपूण ठक्करनं प्रवीण राऊतच्या मदतीनं गुरू आशिष कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हा पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेतला.
कालांतरानं पुढे वाधवान यांच्या एचडीआयएलनं गुरू आशिषवर ताबा मिळवला ज्यात प्रवीण राऊत यांची 25 टक्के भागीदारी होती. साल 2010 ते 14 दरम्यान गुरू आशिषनं हा एफएसआय बाहेरच्याबाहेर विकून 1 हजार 40 कोटी मिळवले. मात्र हा पैसा पत्रा चाळवासियांची घर बांधण्यात वापरण्याऐवजी एचडीआयएलच्या माध्यमातून इतर कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप ईडीनं या आरोपपत्रातून केला आहे. हे प्रकरण आणि हा तपास इतक्यावरच न थांबता येत्या काळात आणखीन काही अटक होऊन यात पुरवणी आरोपपत्रही सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.