(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पिओमध्ये ठेवलेलं जिलेटिन कमी तीव्रतेचं
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडी मध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. या जिलेटिनची तीव्रता किती होती म्हणजेच जर यांचा वापर स्फोट करण्यासाठी झाला असता तर किती नुकसान झाला असतं
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडी मध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. या जिलेटिनची तीव्रता किती होती म्हणजेच जर यांचा वापर स्फोट करण्यासाठी झाला असता तर किती नुकसान झाला असतं, याची चाचणी करण्यासाठी या कांड्या कलीना फॉरेन्सिक लॅब मध्ये देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये स्पष्ट झालं आहे की कांड्यांची स्फोटक तीव्रता अतिशय कमी होती आणि जर यांचा स्फोट करण्यासाठी वापर करण्यात आला असता तर त्याचं नुकसान फार मोठ झालं नसतं.
येत्या दोन दिवसात या संदर्भातील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर केला जाईल. या जिलेटीनच्या कांड्यांमध्ये अमोनियम नायट्रेटची मात्र कमी होती ज्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता कमी होती. अशा प्रकारच्या जिलेटिन काड्यांचा वापर विहीर खणण्यासाठी, रस्ते कामासाठी केला जातो.
कारमध्ये असणाऱ्या जिलेटिनच्या कांड्यांची स्फोटक क्षमता कमी होती आणि याच संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र ज्या स्कॉर्पिओ गाडी मध्ये जिलेटिन ठेवण्यात आलं होतं त्या स्कॉर्पिओ संदर्भातील रिपोर्ट अजून सादर केला गेला नसल्याची माहिती कलिना फॉरेन्सिक लॅब मधील सूत्रांनी दिली आहे.
स्कॉर्पिओ गाडीची तपासणी फॉरेन्सिक लॅबकडून केली जात असून, या संदर्भात फॉरेन्सिक केमिकल एक्सपोर्टची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. तसेच स्कॉर्पिओ गाडीचा चेसी नंबर मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचा खरा चेसी नंबर मिळवून त्या गाडीचा खरा मालक कोण आहे तसंच ती गाडी कोणाच्या नावावर आहे याचा सुद्धा तपास लावण्यात येणार आहे.
स्कॉर्पिओ गाडी मध्ये कोणाचे फिंगरप्रिंट, केस, रक्ताचे थेंब किंवा अशी कुठलीही गोष्ट सापडते का हे शोधण्याचा प्रयत्न फोरेन्सिक लॅबकडून केला जाणार आहे. ज्यामुळे ती स्कॉर्पिओ कोण चालवत होतं आणि अँटिलिया बाहेर ती नेमकी कोणी उभी केली याचा शोध लावण्यास मदत होईल.
मनसुख हिरण प्रकरण
मनसुख हिरण प्रकरणातही फॉरेन्सिक लॅबोरेटरी कडून तपासणी केली जाणार आहे जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारचा विष किंवा तत्सम पदार्थ देण्यात आला आहे का हे स्पष्ट होईल. मनसुख हिरण यांचा 5 मार्च रोजी मुंबईच्या रेतीबंदर खाडीमध्ये मृतदेह आढळून आला होता.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवणे आणि मनसुख हिरण यांचं मृत्यू प्रकरण या दोन्ही घटनांचा तपास आता एनआयए करत आहे. एनआयएसुद्धा केंद्रीय फॉरेन्सिक टीमची मदत घेत आहे. पुण्यातील या फॉरेन्सिक पथकाकडून शुक्रवारी सचिन वाझे यांच्या मालकीच्या असलेल्या गाड्यांची तपासणी केली गेली. तर, रात्री मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ पार्क होती त्या ठिकाणाच नाट्य रूपांतर केलं गेलं. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या प्रकरणात कुठचं वळण येतेय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.