लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाने एक्झिट घेतली असली तरी आता अवकाळी पावसाची हजेरी तापदायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

Maharashtra weather update: राज्यभरात दिवाळीचा उत्साह दिसत असताना लक्ष्मीपूजनादिवशी मराठवाड्यासह कोकण व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टीतून सावरत असलेल्या मराठवाड्यात काल पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या. काल तळ कोकणासह विदर्भ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट होते. आजही बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे आहेत. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. (IMD weather forecast )
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रायगड ,रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्हासह मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरसह, नांदेडमध्ये पुन्हा पाऊस झाला. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून आर्द्रता कायम आहे. दिवाळीपासून पहाटे हवेत गारवा जाणवतो. यंदा मात्र उकाडा कायम आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाने एक्झिट घेतली असली तरी आता अवकाळी पावसाची हजेरी तापदायक ठरणार असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज तळ कोकणासह मध्य दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/fxLTuqvhYq
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 21, 2025
रत्नागिरी सिंधुदुर्गसह कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांना पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड तर विदर्भात बुलढाणा ,यवतमाळ ,चंद्रपूर ,गडचिरोली जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.आज बहुतांश मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील तीन दिवस राज्यभर पावसाचे इशारे
23 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ,बीड, नांदेड, वाशिम ,यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर ,गोंदिया, गडचिरोली - यलो अलर्ट
24 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली
25 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर ,संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भात पावसाचे येलो अलर्ट
बीड जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट
बीड जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आलाय. काल आष्टी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. तर आज ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली त्यामुळे वार्षिक सरासरीच्या दीडपट पावसाचे नोंद झाली आहे. दुसरीकडे अतिवृष्टी परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. बीड जिल्ह्याची वार्षिक सरासरी 566 मिलिमीटर असताना यंदा पूर्ण कालावधीत 925 मिलिमीटर पाऊस झाला. तर अशातच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार ऐन दिवाळीच्या लगबगीत पावसाचे संकट दिसून येते. याचाच परिणाम काढणीला आलेल्या पिकासह कापूस वेचणीवर देखील दिसून येण्याची शक्यता आहे.


















