Mumbai Boat Accident : नीलकमल बोटीखालून अचानक हात बाहेर आला अन् 14 वा मृतदेह सापडला; 26 तासांनी हंसाराम भाटींचं शव मिळालं
Mumbai Boat Accident : बोट अपघातातील मृत व्यक्तींचा शोध सुरु असतानाच 14 वा मृतदेह सापडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला असता मृत व्यक्तीची ओळख पटली आहे.
Mumbai Boat Accident : मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ (Gateway Of India Boat Accident) येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या आता 14 झाली आहे. गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.
14 व्या मृतदेहाची ओळख पटली...
बोट अपघातातील मृत व्यक्तींचा शोध सुरु असतानाच 14 वा मृतदेह सापडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला असता मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. मालाडचे रहिवासी असलेले हंसाराम भाटी हे 43 वर्षांचे होते. मालाडचे रहिवासी असलेले भाटी यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. आपली पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा यांच्याबरोबर ते तानाजी नगर परिसरात राहात होते.
दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधील नातेवाईक प्रवीण राठोड आणि नीता हे त्यांच्याकडे राहण्यासाठी आले होते. तेव्हा नातेवाईकांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया आणि एलिफंटाला जाण्याचा भाटी यांनी प्लॅन केला. मात्र, बोट दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात राठोड दाम्पत्य आणि भाटी यांची पत्नी तसेच मुलगा तरुण वाचला आहे.
सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान बोटीखालून हात बाहेर आल्याचे समजताच पथकाने त्या भागात शोध सुरु केला. त्यानंतर बचाव पथकाने बोटीखाली अडकलेला मृतदेह काढण्यास सुरुवात केली. बोटीचा काही भाग कापून मृतदेह बाहेर काढून जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेह हंसाराम भाटी यांचा असल्याचं स्पष्ट होताच भाटी कुटुंबियांनी टाहो फोडला.
उत्तर प्रदेशातून लग्नासाठी आलेल्या महिलेचा बोट अपघातात मृत्यू
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आलेल्या 50 वर्षीय रामरती देवी गुप्ता यांचा बोट अपघातात मृत्यू झाला. त्या नालासोपारा पूर्व येथे राहणाऱ्या त्यांच्या धाकट्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्न 11 डिसेंबरला झाल्यानंतर बुधवारी रामरती देवी गुप्ता आपल्या पुतण्या आणि मुलीसह मुंबई फिरायला गेल्या होत्या. या दरम्यान, बोटीतून एलिफंटा बेट पाहत असताना बोटीला अपघात झाला. बोट उलटल्यामुळे त्या पाण्यात पडल्या. त्यांचे पुतणे गौतम गुप्ता यांनी सांगितले की, पाण्यात जवळपास 15 मिनिटे ते संघर्ष करत होते. त्यांनी रामरती देवींच्या बचावासाठी खूप प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवता आले नाही. हा अपघात त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आघात असून संबंधित घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोट अपघातातील मृतांची नावे :
1. महेंद्रसिंग शेखावत (नौदल)
2. प्रवीण शर्मा
3. मंगेल (नौदल बोट कर्मचारी)
4. मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी जहाज)
5. राकेश नानजी अहिरे (प्रवासी जहाज)
6. साफियाना पठाण
7. माही पावरा (3 वर्ष)
8. अक्षता राकेश अहिरे
9. मिथु राकेश अहिरे (8 वर्ष)
10. दीपक व्ही.
11. हंसाराम भाटी
(दोन महिला यांची अद्याप ओळख पटलेली नाही.)
हे ही वाचा :