Mumbai : मुंबई मनपाच्या दवाखान्यावर भूमाफियांचा डोळा! BMC अधिकाऱ्यांनी बाऊन्सर्सला हुसकावून लावत पुन्हा मिळवला ताबा
BMC दवाखान्यात देखील घुसून भूमाफिया जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत.असाच एक प्रयत्न पवई येथील तुंगा व्हिलेजमध्ये झाला, परंतु अधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने याला विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला.
Mumbai News : मुंबई जागेला सोन्याचा भाव आला आणि त्यामुळे इथे भूमाफिया (Mumbai Land Mafia) ही मोठ्या प्रमाणत तयार होऊ लागले. मुंबईच्या शासकीय भूखंडांवर नेहमीच भूमाफियांचा डोळा राहिला आहे. मोकळे भूखंडच नाहीतर चक्क आता मुंबई मनपाच्या (BMC) दवाखान्यात देखील घुसून हे भूमाफिया जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच एक प्रयत्न पवई येथील तुंगा व्हिलेजमध्ये झाला. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने याला विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला.
पवईच्या तुंगा गावामध्ये अगदी रस्त्याला लागून असलेल्या भूखंडावर पालिकेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक (Balasaheb Thackeray Clinic) उभारले आहे.मात्र या क्लिनिकच्या जागेवर काही व्यक्तींकडून दावा ठोकण्यात आला होता आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं. त्यासाठी त्यांनी त्यांचे बाऊन्सर्स देखील या क्लिनिकमध्ये घुसवले.
नऊ तारखेला या क्लिनिकचं उद्घाटन होणार होतं, परंतु या गेटला खाजगी बाउन्सर्सकडून टाळे ठोकण्यात आल्यानंतर या क्लिनिकचे उद्घाटन होऊ शकलं नाही. याबाबत पालिका एल विभागाकडून तक्रार दाखल करून पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी पालिकेला आवश्यक मदत न केल्याने हा ताबा पालिकेला घेताच आला नाही. काल या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन करीत टाळे तोडण्याचा इशारा देण्यात आला होता. तर आज स्वतः उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त महादेव शिंदे हे शेकडो पालिकेचे कर्मचारी आणि सुरक्ष रक्षक घेऊन या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हे टाळे तोडून आत प्रवेश केला.
पालिका एल विभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचा हा प्लॉट काही करून गिळू देणार नाही असा पवित्रा घेतला. पोलिसांची मदत मिळत नसली तरी आपण ताबा घेऊ असा निश्चय करून आज सकाळी अकरा वाजता त्यांनी इथे टाळे तोडून प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या बाऊन्सर्सना अक्षरशः हाकलून बाहेर काढले. यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली.मात्र पालिकेचा पवित्रा पाहून बाऊन्सर मुकाट निघून गेले.
हे सगळं तणावाचे वातावरण निवळल्यांतर लगेच पालिकेने या क्लिनिकमध्ये उपचार सुरू केले.पहिल्याच दिवशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपासणीही केली.तर स्थानकांनी देखील इथे हजेरी लावली.पालिका एल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालिकेची जागा मिळविण्यासाठी दाखविलेल्या धाडसाचे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनीही कौतुक केले.
मुंबई मनपाच्या एल विभागाने आज आपले क्लिनिक आणि आपली जागा परत मिळवली खरी, परंतु मुंबईत असे अनेक शासकीय भूखंड हडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत, काही ठिकाणी हडपले देखील गेले आहेत.या सर्व ठिकाणी प्रशासन अशाच प्रकारे ताकद लावून ते परत मिळतील का असा सवालही निर्माण होत आहे.
ही बातमी देखील वाचा