एक्स्प्लोर
Advertisement
हॉटेलमध्ये वेटरचं काम, ग्राहकांचे डेबिट कार्ड क्लोन करुन लूट
हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या बिलाचे पैसे भरण्यासाठी आरोपी त्यांचं डेबिट किंवा क्रेडीट कार्ड हाताळत असे
मुंबई : मुंबईत हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांचं डेबिट कार्ड स्किमर मशिनवर कॉपी करुन बँक खात्यातून पैसे लंपास करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आलं आहे. मुलुंड पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण विभागाने वेटरचं काम करुन 64 ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीला अटक केली आहे. करण उर्फ धनेश सुरेश टंडन, तुकाराम गुडाजी उर्फ विजय रेड्डी आणि मारुती बर्मा गुडाजी अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत.
एटीएम कार्ड आपल्या जवळ असताना धारवाडमधून 24 हजार रुपये काढले गेल्याची तक्रार एका व्यक्तीने केली होती. या गुन्ह्याचा तपास मुलुंड पोलिस ठाण्याचे सायबर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांच्याकडे दिला होता. तक्रारदाराचं एटीएम कार्ड ज्या बँकेचं होतं, त्याच्या नोडल अधिकाऱ्यांना बोलवून पोलिसांनी अशा प्रकारच्या आणखी तक्रारी आहेत का? याबाबत माहिती मागवली. तेव्हा एकूण 64 ग्राहकांच्या तक्रारी बँकेकडे आल्याचं सांगण्यात आलं.
सर्व 64 ग्राहकांनी फसवणूक होण्यापूर्वी त्यांच्या डेबिट कार्डचा व्यवहार कुठे केला होता? याबाबत माहिती मिळवण्यात आली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांनी मुंबईतील सुनिल हॉटल प्रा लि, अपना धाबा, अर्बन तडका, रेन फॉरेस्ट यापैकी एका हॉटेलमध्ये त्यांच्या डेबिट-क्रेडीट कार्डचा वापर केला असल्याचं दिसून आलं.
पोलिसांनी या सर्व हॉटेलमध्ये जाऊन तपास केला, तेव्हा धनेश सुरेश टंडन नावाच्या इसमाने सदरच्या सर्व हॉटेलमध्ये काही दिवसांकरीता काम केल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या बिलाचे पैसे भरण्यासाठी तो त्यांचं डेबिट किंवा क्रेडीट कार्ड हाताळत असल्याचीही माहिती मिळाली.
पोलिसांनी धनेश टंडनला छत्तीसगड वरुन अटक केली. त्याने हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या एटीएम कार्डचा डाटा स्कीमर मशिनद्वारे चोरला होता. त्यांचे पिन कोड नंबर एका कागदावर लिहून ती माहिती बेळगावमध्ये राहणाऱ्या तुकाराम गुडाजी उर्फ विजय रेड्डी याला दिल्याची कबुली दिली.
तुकारामने त्या एटीएम डेबिट आणि क्रेडिट कार्डची कॉपी तयार केली आणि त्या कार्डवरुन तो धारवाड, बेळगाव या ठिकाणच्या एटीएम सेंटरचा वापर करुन रक्कम काढत असे.
ज्या ज्या ठिकाणाहून रक्कम काढण्यात आली त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज बँकेने मिळवले. त्याच्या माहितीवरून बेळगाव, कर्नाटकमध्ये पोलिस पथक पाठवून तपास करण्यात आला. त्यावेळी मारुती बरमा गुडाजी आणि तुकाराम गुडाजी यांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणामुळे आपले डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड हॉटेलमध्ये वापरताना सावधानता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement