Mumbai News : अंधेरीत इमारतीचे बांधकाम सुरू असताना माती खचली, ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू
Andheri Accident : मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकले आहेत का याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे. या ठिकाणचे काम बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

मुंबई : अंधेरीतील मरोळ परिसरात बांधकामाच्या ठिकाणी माती खचल्याने ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सोनेलाल प्रसाद असं मयत कामगाराचं नाव असून तो 27 वर्षांचा होता.
मुंबईत सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मरोळ पाईपलाईन परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असताना माती खचली. मरोळ परिसरात लीला बिजनेस पार्क फेझ टू या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी चार कामगार काम करत होते.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू
सोमवारी संध्याकाळी या इमारतीची माती खचली आणि दोन कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला दोन्ही कामगारांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आलं. जखमी कामगारांना कूपर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची चौकशी करण्याचे आदेश
या ठिकाणच्या मातीखाली अजून काही कामगार अडकले आहेत का याच्या शोध देखील अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. घटनास्थळी स्थळी स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी भेट दिली. मुंबई महानगरपालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याचा सूचना देण्यात आली आहे.
अंधेरीतील शाळेची इमारत धोकादायक
मुंबईतल्या अंधेरी पूर्व येथील ओल्ड नगरदास रोडवरच्या मुंबई महापालिका शाळेतल्या सातशे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचं नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिसून आलं. या शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असून, त्याच इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे.
शाळेची इमारत साठ वर्षे जुनी असून, इमारतीच्या अनेक भिंतींना तडे गेले आहेत. या शाळेचा स्लॅबही कोसळलेला असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं सावट आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळं स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई आणि ठाण्यासह आसपासच्या महानगरांना आज मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. पुढच्या काही तासांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह आसपासच्या परिसरात आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच मुंबई, ठाणे आणि पालघरसह नजिकच्या रायगड जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:























