Mumbai Police : मुंबई पोलिसांना 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागे कतारमधील अनिसचा हात, गृहमंत्र्यांनी घेतला तपासाचा आढावा
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या संबंधित वसईतील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले परंतु त्याच्याकडून कोणतीही संशयास्पद माहिती समोर आलेली नाही.
Mumbai Police Threatened : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज करण्यात आलेला मोबाईल नंबर हा पाकिस्तानातील असल्याची माहिती समोर आली आहे. हा क्रमांक पाकिस्तानचा असला तरी त्या नंबरचा IP अॅड्रेस वापरून व्हॉट्सअॅपवर करण्यात आलेला मेसेजचा IP अॅड्रेस अन्य देशाचा असल्याची माहिती एबीपी न्यूजला एका अधिकाऱ्याने दिली आहे
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेजचा तपास करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहे. धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचे नाव अनिश असून तो दोहा येथील असल्याची संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. या व्यक्तीवर या अगोदर देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासाबाबत मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असल्याने या प्रकरणातील तपासाविषयी माहिती त्यांना देण्यात येत आहे. या संदर्भात मुंबई क्राईम ब्रान्चने व्हॉट्सअपकडेदेखील मेसेजचा रिअल आयपी अॅड्रेस देण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे हा मेसेज कोणत्या देशात बसून केला आहे या विषयी माहिती मिळण्यास मदत होईल.
तपासादरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, ज्या सात नंबरचा उल्लेख करण्यात आला ते नंबर उत्तरप्रदेशातील बिजनोर येथील आहे. त्यापैकी चार जणांची चौकशी मुंबई पोलिस करत आहे. तर तीन नंबर हे अनेक वर्षापासून सक्रिय नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी टेलिकॉम कंपन्यांकडे या नंबरविषयी माहिती मागितली आहे,
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या संबंधित वसईतील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले परंतु त्याच्याकडून कोणतीही संशयास्पद माहिती समोर आलेली नाही. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. क्राईम ब्रान्च UP ATS सोबत या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चची एक टीम उत्तरप्रदेशला रवाना झाली आहे. UP ATS ने दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे, त्यांची चौकशी मुंबई क्राईम ब्रान्च करणार आहे. या शिवाय एक टिम हरयाणाला देखील गेली आहे. जिथे चौथ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रान्चने केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून काम करत आहे जेणेकरून कतारच्या दोहामध्ये बसलेली अनिश कोण आहे? याचा शोध लागेल