Maratha Reservation : राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार : अशोक चव्हाण
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काल कोल्हापुरात पाहिलं मूक आंदोलन झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje chhatrapati) यांना बैठकीसाठी बोलावलं होतं.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काल कोल्हापुरात पाहिलं मूक आंदोलन झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje chhatrapati) यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. यावेळी बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.
या बैठकीनंतर मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आम्ही या मागणीसाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात आम्ही जाणार आहोत. रिव्ह्यू पीटीशन नुसतं फाईल करून अर्थ नाही. 50% मर्यादा घालण्यात आली आहे. या बाबी पाहाव्या लागतील. आठवडाभराच्या आत पिटीशन दाखल झाली पाहिजे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, असं चव्हाण म्हणाले.
चव्हाण यांनी सांगितलं की, आजच्या बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी सात मागण्या केल्या. हॉस्टेल उपलब्ध करून द्यावेत अशी त्यांची मागणी होती. आम्ही 23 जिल्ह्यात त्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहोत. कालबद्ध कार्यक्रम म्हणून आम्ही हे करू. मुख्यमंत्री या विभागाचा आढावा घेऊन कारवाई कशी होते हे पाहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, कोपर्डी विषय न्यायप्रविष्ठ आहे. शासनाने प्रक्रिया पूर्ण केली आहे. लवकरात लवकर केस लागावी हा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर छत्रपती संभाजीराजे व मराठा क्रांती मोर्चा यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे.























