Mirzapur Web Series Controversy Exclusive | जाणून घ्या, का सुरु आहे मिर्झापूर विरुद्ध मुंबई पोलिसांतील संघर्ष
मिर्झापूर' वेब सीरिजच्या विरोधात उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मिर्झापूर पोलीस मुंबईत आले होते.
Mirzapur Web Series Controversy 'मिर्झापूर' वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी मिर्झापूर पोलीस अभिनेता फरहान अख्तर याच्या घरी पोहोचले. जेथे मुंबई पोलीस आणि मिर्झापूर पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. 'मिर्झापूर' वेब सीरिजच्या विरोधात उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मिर्झापूर पोलीस मुंबईत आले होते.
नियमांनुसार, बाह्यराज्यांतून कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या पोलिसांना मुंबई पोलिसांच्या नोडल ऑफिसर अर्थात (क्राइम ब्रांच DCP) च्या परवानगीची आवश्यकता असते. याच परिस्थितीमध्ये मिर्झापूर पोलीस मागील दोन दिवसांपासून क्राईम ब्रांचमधील पोलीस उपायुक्त अकबर पठान यांच्या कार्यालयावर फेऱ्या टाकत आहेत. परंतु ते इथं उपबल्ध नसल्यामुळं मिर्झापूर पोलिसांना आवश्यक ती परवानगी मिळू शकली नाही.
गुरुवारी सकाळच्या सुमारासही मिर्झापूर पोलीस मुंबईतील अंधेरी स्थित क्राईम ब्रांच पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. पण, मुंबई पोलिसांकडून त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळू शकलं नाही. ज्यानंतर मिर्झापूर पोलिसांनी फरहान अख्तर याचं खार येथील घर गाठलं. याबाबतची माहिती तातडीनं स्थानिक खार पोलीसांपर्यंत पोहोचली. पुढं खार पोलीस स्थानकातील काही पोलीस अधिकारी फरहान अख्तरच्या निवासस्थानी पोहोचले, जिथं मुंबई आणि मिर्झापूर पोलिसांत वाद झाल्याचं वृत्त समोर आलं.
रितसर परवानगी आणा आणि तपास करा, असं मिर्झापूर पोलिसांना मुंबई पोलिसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. या वादानंतर मिर्झापूर पोलीस फरहान अख्तरच्या घरातून निघून गेले.
दरम्यान, अरविंद चतुर्वेदी नामक तक्रारदारानं या वेब सीरिजविरोधात एफआयआर दाखल केली आहे. 17 जानेवारीला देहात पोलीस स्थानंकात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिर्झापूरची प्रतिमा मलिन करण्याप्रकरणी आणि एका ठराविक जात- समुहाच्या भावना दुखावल्याप्रकरणी या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
'एबी'पी न्यूजशी संवाद साधताना मिर्झापूर पोलिसांच्या चमूतील एसएचओ बी.ए. चौरसिया यांनी याबाबतची माहिती दिली. शिवाय मिर्झापूर पोलीस इथं मुंबईतील नोडल ऑफिसर यांच्या परवानगीसाठीच आले आहेत असं म्हणज परवानगी मिळाल्यानंतर तपास सुरु करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सदर प्रकरणी रितेश सिधवानी, फरहान अख्तर, भौमिक आणि अॅमेझॉन प्राइम यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.