(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mhada Lottery 2023 Mumbai : म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली; 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात, 18 जुलै रोजी सोडत
Mhada Lottery 2023 Mumbai : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 18 जुलै रोजी सोडत जाहीर होणार आहे.
Mhada Lottery 2023 Mumbai : म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाच्या (Mumbai Mhada) घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी (House) सोमवारी, 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये आहेत. 22 मे पासूनच नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया 26 जूनपर्यंत सुरु राहणार असून 18 जुलै रोजी वांद्रे पश्चिम इथल्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची मागील एक वर्षापासून चर्चा सुरु होती. परंतु काही कारणांमुळे सोडतीला उशीर झाला. मुंबई मंडळातील घरांसाठी शेवटची सोडत 2019 मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ 217 घरांचा समावेश होता. अखेर मंडळाने आता 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार सोमवार 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे?
22 मे रोजी 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यापैकी यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2788, अल्प उत्पन्न गटासाठी 1022, मध्यम उत्पन्न गटासाठी 132 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 39 घरे उपलब्ध करुन दिली आहेत.
अत्यल्प उत्पन्न गटात 2 हजार 788 घरे
सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात गोरेगावमधील पहाडी इथल्या पंतप्रधान आवास योजनेतील 1947, अँटॉप हिलमधील 417 तर, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील 424 अशी एकूण 2 हजार 788 घरांचा समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटात 1 हजार 22 घरे
तर, अल्प उत्पन्न गटात एकूण 1022 घरांचा समावेश असून त्यात गोरेगावमधील पहाडी परिसरातील 736 घरे आहेत. उर्वरित घरे दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), पत्राचाळ, जुने मागाठाणे (बोरिवली), चारकोप, कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाडा या ठिकाणची आहेत.
मध्यम उत्पन्न गटात 132 घरे
मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने 132 घरे उपलब्ध करुन दिली आहेत. ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर), कांदिवली इथली आहेत.
उच्च उत्पन्न गटात 39 घरे
तसंच उच्च गटासाठी केवळ 39 घरांचा समावेश असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, सायन, शिंपोली, तुंगा पवई या ठिकाणी आहेत.
दरम्यान गोरेगाव पहाडी परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील 1947 घरांची किंमती प्रत्येकी अडीच लाखांचे अनुदान वजा करुन 30 लाख 44 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंत आहेत.
VIDEO : Mumbai Mhada Lottery : मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीला अखेर मुहर्त