McDonald's बर्गर खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, FDA च्या कारवाईमुळे खाद्यपदार्थांतून 'चीज' गायब
Cheese Burger and Nuggets: ‘मॅकडोनाल्ड’वर FDA ची मोठी कारवाई; खाद्यपदार्थांतून 'चीज' गायब. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर खाद्यपदार्थांच्या मेन्यूत बदल. विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थाचा वापर
मुंबई: अनेक खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या 'मॅकडोनाल्ड' या साखळी रेस्तराँवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे 'मॅकडोनाल्ड'च्या मेन्यूमधून 'चीज' गायब होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागात 'मॅकडोनाल्ड'चे बर्गर (McDonald's Burger) आणि तत्सम पदार्थ प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. विशेषत: तरुण वर्गाकडून 'मॅकडोनाल्ड' रेस्तराँमधील पदार्थांचे सर्रास सेवन केले जाते. यामध्ये चीज असलेल्या बर्गर व अन्य पदार्थांना अधिक पसंती दिली जाते. परंतु, अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे आता 'मॅकडोनाल्ड'कडून त्यांच्या मेन्यूतून चीज हा शब्द हटवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
अहमदनगर येथील ‘मॅकडोनॉल्ड’ येथील रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व सुरक्षा आयुक्तांनी नेमलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी संबंधित ‘मॅकडोनॉल्ड’ आऊटलेटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, संबंधित आऊटलेटने या नोटीसकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राजेश बढे आणि डॉ. बी. डी. मोरे या अधिकाऱ्यांनी अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले जात नसल्यामुळे अखेरीस या पदार्थांची विक्री थांबविण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ‘मॅकडोनॉल्ड’ ही रेस्तराँची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्तराँ प्रा. लि. या कंपनीने अखेरीस आपण पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे.
या निर्णयामुळे काय होणार?
'मॅकडोनाल्ड' रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये चीज नव्हे तर चीजसदृश पदार्थ वापरला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब कंपनीनेही मान्य करत पदार्थांच्या नावांमधून 'चीज' हा शब्द हटवल्याचे सांगितले जाते. हा आदेश अहमदनगरपुरता मर्यादीत असला तरी ते राज्यातील ‘मॅकडोनॉल्ड’च्या सर्वच रेस्तराँना लागू असेल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
मॅकडोनाल्डकडून स्पष्टीकरण
“महाराष्ट्रातील मॅकडोनाल्ड्स स्टोअर्समधील आमच्या मेन्यूमधून 'चीज' हा शब्द काढून टाकल्याच्या अलीकडील अहवालांबाबत आम्ही आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये फक्त शुद्ध (रिअल), दर्जेदार चीज वापरतो. आम्ही या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत आहोत. आमच्या घटकांमधील पारदर्शकतेप्रती आमची वचनबद्धता आणि आमच्या ग्राहकांना स्वादिष्ट, उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याप्रती समर्पितता अतूट आहे.”
'मॅकडोनाल्ड'च्या खाद्यपदार्थांच्या नावात नेमका काय बदल झाला?
ज्या खाद्यपदार्थांच्या नावात चीजचा उल्लेख होता, तो हटवण्यात आला आहे. त्यामुळे आता 'मॅकडोनाल्ड'च्या खाद्यपदार्थांची नावे पुढीलप्रमाणे असतील. वेज नगेटस (चीजी नगेटस), चेड्डार डिलाईट वेज – नॉनवेज बर्गर (मॅक चीज वेज – नॉनवेज बर्गर), अमेरिकन वेज बर्गर (कॉर्न चीज बर्गर), अमेरिकन नॉन-वेज बर्गर (ग्रील्ड चिकन अॅण्ड चीज बर्गर), ब्ल्यु बेरी केक (ब्ल्यु बेरी चीज केक), इटालियन वेज- नॉन वेज बर्गर (चीजी इटालियन वेज- नॉन वेज बर्गर).
आणखी वाचा
India's Biggest Burger : अबब! पठ्ठ्याने बनवला 30 किलोचा बर्गर, Mcdonald's आणि बर्गर किंगही ठरेल फेल
रशियामध्ये 26 हजार रुपयांना McDonalds बर्गर, जाणून घ्या या मागचं कारण