(Source: Poll of Polls)
राणीच्या बागेतील पेंग्विन हा मुंबईकरच,ऑस्कर नावाला आक्षेप घेणाऱ्या पक्षाची भूमिका दूतोंडी'; महापौर किशोरी पेडणेकरांचा निशाणा
ऑस्कर नावाला आक्षेप घेणाऱ्या बोलकी बाहुलीचा पक्ष गोव्यात त्यांच्या भाऊबंधांकडे मतांची भीक मागत फिरतायेत. अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mumbai : नुकतंच राणीच्या बागेतील पेंग्विनचं नाव ऑस्कर ठेवण्यात आलं आहे. या नावावरून विरोधी पक्षातून बरीच टीका केली जात आहे. पेंग्विनचं नाव ऑस्कर ठेवण्याच्या वादात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना टोमणा मारला होता. 'मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला पेंग्विनचं नाव मराठीत ठेवता आलं नाही का?' असा सवाल ट्वीट करत चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना केला. याच ट्विटला प्रतिउत्तर देत महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. राणीच्या बागेतील पेंग्विन हा मुंबईकरच आहे. ऑस्कर नावाला आक्षेप घेणाऱ्या बोलकी बाहुलीचा पक्ष तिकडे गोव्यात त्यांच्या भाऊबंधांकडे मतांची भीक मागत फिरतायेत. मुंबईत एक भूमिका आणि गोव्यात एक भूमिका ही आहे यांची दूतोंडी भूमिका. समजलं का चिवा ताई, अशा शब्दांत महापौरांनी टोला मारला आहे.
तसेच, आता बालिशपणा वाढत चालला आहे. नुसती उंची वाढून चालणार नाही तर विचारांची उंची वाढावी जी दुकानात मिळत नाही, असेही त्या म्हणाल्या. राणीच्या बागेतील पेंग्विन हा आता पेंग्विनकर झालेला आहे. यावर बोलणं आता योग्य वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचं काम घराघरांत पोहोचतंय हीच यांची पोटदुखी आहे अशा शब्दांत महापौरांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांनी चावी मारलेल्या बोलक्या बाहुल्या महापालिकेच्या कामावर बोलतायत. गुजरातमध्ये सुद्धा पेंग्विन पार्क होतोय, तिथे काय नाव आहेत ते बघा आणि मग टीका करा, असंही महापौर म्हणाल्या.
पुढे त्या असंही म्हणाल्या, हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात येतेय. शाळा सुरु करण्यासंबंधी कालच मंत्री आदित्य ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याचा आदेश दिला आहे. पालकांच्या संमतीनेच मुलं शाळेत येतील. त्यामुळे आम्ही काळजी घेतोच आहोत पण तुम्हीही घ्या आणि मुलांना शाळेत पाठवा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.
तसेच, वॉर्ड पुनर्चनेच्या बाबतीत बोलताना त्या म्हणाल्या की, वॉर्ड पुरर्रचनेबाबत निवडणूक आयोग निर्णय देतील. या निर्णयाचे आम्ही स्वागतंच करू. आम्ही आमच्या फायद्यासाठी वॉर्ड पुरर्रचना केली नाहीये. मुंबईकरांचा विश्वास शिवसेनेवर आहे, त्यामुळे असं फायद्याचं गणित आम्ही बघत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Club House App : क्लब हाऊस अॅप प्रकरणातील आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कामगिरी
- कौतुकास्पद! जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावली, भारतीय नौदलाकडून तात्काळ मदत
- Mumbra News : पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही, घरांबाबतच्या मध्य रेल्वेच्या नोटिशीनंतर खासदार शिंदेंची आक्रमक भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha