(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तकाचं प्रकाशन; उद्योजक प्रफुल्ल वानखेडेंच्या पुस्तकाने रचले विविध विक्रम
Gosht PaishaPanyachi Book : आर्थिक साक्षरतेची सोप्या भाषेत कुंडलीच मांडण्याचं काम करणाऱ्या 'गोष्ट पैशापाण्याची' या उद्योजक प्रफुल्ल वानखेडे (Prafull wankhede) लिखित पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत पार पडलं.
Prafull Wankhede Gosht PaishaPanyachi Book : आर्थिक साक्षरतेची सोप्या भाषेत कुंडलीच मांडण्याचं काम करणाऱ्या 'गोष्ट पैशापाण्याची' या उद्योजक प्रफुल्ल वानखेडे (Prafull wankhede) लिखित पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत पार पडलं. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, लेखक दिग्दर्शक अरविंद जगताप, एबीपी न्यूज आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, सकाळचे संपादक राहुल गडपाले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणारे प्रफुल्ल वानखेडे हे तरुण उद्योजक लोकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी सातत्याने वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहित असतात. आता त्यांच्या या पुस्तकांच्या लोकांना आर्थिक साक्षरतेचे आणि अर्थ नियोजनाची माहिती मिळणार आहे. आपला उद्योग व्यवसाय सांभाळून लेखनासोबतच वानखेडे यांनी वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी लेट्स रीड ही अभिनव चळवळ सुरु केली आहे. सामाजिक भान राखून आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे या ध्येयाने ते सतत कार्यरत आहेत, असं ते म्हणाले.
प्रफुल्ल वानखेडे यांनी सकारात्मकतेची बीजे अत्यंत प्रभावी पद्धतीनं रोवली- राजीव खांडेकर
राजीव खांडेकर म्हणाले की, आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत असते. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. नकारात्मकता वाढीस चालली असताना सोशल मीडियाचा योग्य वापर करुन प्रफुल्ल वानखेडे यांनी सकारात्मकतेची बीजे अत्यंत प्रभावी पद्धतीनं रोवली आहेत, असं राजीव खांडेकर म्हणाले.
रुपाली चाकणकर यांनी देखील प्रफुल्ल वानखेडे यांना शुभेच्छा देताना म्हटलं की, हे पुस्तक महिलांसाठी देखील खूप महत्वाचं आहे. कारण अर्थव्यवस्था मजबूत करण्यामागे महिलांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
पुस्तकाने रचले विविध विक्रम, 18 हजारांवर प्री बुकिंग, अमेझॉनवर टॉपवर
नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे. या पुस्तकानं प्री बुकिंगमध्ये नवे विक्रम रचलेत. 18 हजारांच्या वर प्री बुकिंग झाली आहे. मराठी साहित्य आणि पब्लिशिंग क्षेत्रात एक नवा विक्रम 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तकाच्या निमित्ताने झाला आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 30 हजारांची आहे. अमेझॉनवर प्रादेशिक भाषा विभागात गेल्या महिनाभरपासून #गोष्टपैशापाण्याची पुस्तक टॉपवर आहे. शिवाय ओव्हरऑल पुस्तकांत टॉप 100मध्ये कायम आहे