Manoj Jarange Patil Mumbai Morcha: CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या अनेक मार्गात बदल
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan: सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर (Maratha Reservation Protest Azad Maidan) उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासून (1 सप्टेंबर) पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवाची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज (1 सप्टेंबर) बंद राहणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक ही देण्यात आली आहे. वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक या दोन वाहतूक पोलिस चौक्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणत्या वाहतूक मार्गात बदल?
जे.जे उड्डाणपुला मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंबई पोलीस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिले जाणार आहे. तर मेट्रो जंक्शन ते CSMT च्या दिशेने येणारा आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगर पालिका मार्गही बंद ठेवला जाणार आहे.शिवाय हजारीमल सोमानी रोड जो फॅशनस्ट्रीटहून CSMT कडे येणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद ठेवला जाणार आहे. हुतात्मा चौकहून सीएसएमटीच्या दिशेने येणारा वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहे. तसेच मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीनड्राईव्ह जंक्शन हे मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसापासून मराठा आंदोलकांनी फ्री वे वर वाहने उभी केल्याने बंद असलेला फ्री वे उद्या वाहतूकीसाठी खुला राहणार आहे.
भगवे रुमाल अणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत- मनोज जरांगे
गळ्यात भगवे रुमाल अणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या माघारी पाठवत आहेत. जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलंय, असं या पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचं जरांगे म्हणाले. या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी जरांगेंनी केली. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला आहे.























