एक्स्प्लोर
Advertisement
व्हायरल व्हिडीओचा फटका, नवी मुंबई एपीएमसीत आंब्याच्या दरात घसरण
वाशीतील एपीएमसीत दिवसाला सव्वालाख ते दीड लाख आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. मात्र या व्हायरल व्हिडीओचा फटका आंब्याच्या विक्रीला बसला आहे.
नवी मुंबई : आंब्यावर केमिकलची फवारणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे नवी मुंबई एपीएमसीमधील आंब्याचे दर घसरले आहेत. वाशीतील एपीएमसीत दिवसाला सव्वालाख ते दीड लाख आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. मात्र या व्हायरल व्हिडीओचा फटका आंब्याच्या विक्रीला बसला आहे.
आंब्यावर केमिकलची फवारणी करून चुकीच्या पद्धतीने आंबे पिकवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामुळे किरकोळ बाजारात आंबा विक्री घटल्याने आंब्याचे दर 400 रुपये डझनवरुन 200 रुपये डझनावर आले आहेत.
आंब्याचे दर जवळपास पन्नास टक्क्यांनी उतरल्याने कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय एपीएमसीतील व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.
आवक वाढली, मात्र दर घसरले
फळांचा राजा असलेला हापूस सध्या एका चुकीच्या व्हायरल व्हिडीओमुळे अडचणीत आहे. एपीएमसीमध्ये आंबा त्वरित पिकवण्यासाठी रसायनांचा फवारा केला जात असल्याचा व्हिडीओ कुणीतरी सोशल मीडियावर टाकला. तीन दिवसात हा व्हिडीओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं.
ग्राहकांनी व्हायरल व्हिडीओ पाहून हापूस आंबा विकत घेणं कमी केलं आहे. याचा मोठा फटका विक्रीला बसला आहे. एकीकडे व्हायरल व्हिडीओमुळे विक्रीत घट झाली आहे, तर दुसरीकडे दोन दिवसांपासून एपीएमसीमध्ये आंब्याच्या आवकीत वाढ झाली आहे. सव्वालाख पेट्यांवरुन आंब्याची आवक दीड लाख पेट्यांवर पोहोचली आहे.
यामुळे आलेला आंबा एपीएमसी मार्केटमध्ये पडून आहे. आंबा शिल्लक राहत असल्याने मिळेल त्या किंमतीला विकण्याची वेळ आली आहे. 400 ते 800 रुपये डझनने विकला जाणारा आंबा आता 200 रुपये ते 400 रुपये डझन झाला आहे.
व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
आंब्यावर इथरेल फवारुन आंबे पिकवले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आंब्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभं राहिलं. मात्र कृषी विभागाच्या परवानगीनेच या रसायनाचा वापर होत असल्याचं, हे व्यापारी सांगत आहेत.
आंबा पिकवण्यासाठी 26 ते 28 डिग्री तापमान लागतं. नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी रायप्लिंग चेंबर उभारले जातात. पणन विभागाने या चेंबर्सच्या उभारणीकडे दुर्लक्ष केलं. तरीही काही व्यापाऱ्यांनी प्रत्येकी 7 ते 8 लाखांचा खर्च करुन हे चेंबर्स उभारले. ज्यांच्याकडे चेंबर्स आहेत ते संरक्षित वातावरणात आंबे पिकवतात. मात्र ज्या व्यापाऱ्यांना हे चेंबर्स परवडणारे नाही, ते इथरेल सारख्या रसायनाचा वापर करतात.
शेतकरी चांगला दर मिळण्याच्या हेतूने आंबा तयार होण्याआधीच मार्केटमध्ये पाठवतात. त्यावर रसायनाचा वापर केला नाही, तर तो सडतो आणि यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं. आंबा पिकवण्यासाठी कृषी विभागानेच इथरेलची शिफारस केली आहे. इथरेलच्या बाटलीवरही त्याच्या वापरासंबंधी नियम दिले आहेत. त्यानुसारच व्यापारी रसायनाचा वापर करतात. कारवाई करताना प्रशासन या गोष्टी विचारात का घेत नाही, असा प्रश्न इथले व्यापारी विचारत आहेत.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
मुंबई
ठाणे
Advertisement