#MaharashtraPoliticalCrisis : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने महाविकास आघाडी सरकार गॅसवर, पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन चिट!
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नसल्याचे म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारवर संकट आले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नसल्याचे सांगत पाठराखण केली आहे. यामागे अजून कोणताही मोठा नेता (भाजपचा) दिसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, बंडखोरांना शिवसैनिकांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन, तर काही प्रत्यक्ष हजर होते. अजित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा राहिल. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.
अजित पवार काय म्हणाले ?
- शरद पवारांनी खासदार, आमदारांची बैठक घेतली
- राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा झालीय
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय
- काम सुरुच ठेवण्याचे आदेश
- याशिवाय दुसरी कोणतीच भूमिका आमची नाही, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणार
- शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते
- काही आमदार परतत आहेत, तेथील आमदारांना मुख्यमंत्री यांनी आवाहन केलंय
- परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत
- महाविकासआघाडी टिकवण्याची भूमिका
- सर्वांना विकास निधी मिळावा ही माझी भूमिका असते, सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे काम असते