MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
MLC Election : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान सुरु आहे. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधऱ आणि नाशिक पदवीधर साठी मतदान सुरु आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra News) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024) चार जागांसाठी आज मतदान होत आहे. यात दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे. या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. या चारही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडत आहे. अनिल परब यांच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मतदान केलं. या चार मतदारसंघातील उमेदवारांकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत कोण कोण रिंगणात?
मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत
ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट
शिवनाथ दराडे : भाजप
सुभाष मोरे : शिक्षक भारती
शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
मुंबई पदवीधर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार
अनिल परब शिवसेना ठाकरे गट
किरण शेलार : भाजप
कोकण पदवीधर मतदारसंघ
निरंजन डावखरे : भाजप
रमेश कीर : काँग्रेस
नाशिक शिक्षक मतदारसंघ :
किशोर दराडे : शिवसेना
विवेक कोल्हे : अपक्ष
संदीप गुळवे : शिवसेना ठाकरे गट
महेंद्र भावसार : राष्ट्रवादी काँग्रेस
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार देण्यात आले आहेत. तर, कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे. महायुतीत भाजप मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर या जागा लढवत आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आला आहे. तर, नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार आहे.
मुंबईत कपिल पाटील आणि ठाकरेंचे उमेदवार आमने सामने
मुंबई शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांनी तीन टर्म शिक्षकांचा आमदार होतो, आता 58 वर्ष वय झाल्यानंतर मला वाटतं की आपण यातून निवृत्त व्हावं, असं म्हटलं. माझ्या तरुण सहकाऱ्याला उमेदवारी दिली आहे. सुभाष मोरे आमचे उमेदवार आहेत, असं कपिल पाटील म्हणाले.
शिक्षकांच्या पेन्शन संदर्भातील लढ्यात सुभाष मोरे यांनी काम केलं. त्याने ही लढाई आमदार होण्याआधी जिंकली. त्यामुळे त्याला उमेदवारी का नको? कोण आम्ही निर्णय घेतला की सुभाष मोरे आमचे उमेदवार असतील असं कपिल पाटील म्हणाले.
ज.मो. अभ्यंकर यांनी स्वत कबूल केलं की आदर्श सोसायटी मध्ये माझा फ्लॅट आहे. त्यांनी उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्र सुद्धा म्हंटल आहे की 1080 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे. त्याची किंमत कोट्यावधी रुपये आहे.
आदर्श घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पदावरून जावं लागलं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वतः मागणी केली होती फक्त मुख्यमंत्री जाऊन होणार नाही. सैन्याचे फ्लॅट हडप करणारे अधिकारी बाबू लोक यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अभ्यंकर यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलेले दिसतय, आदर्श घोटाळ्याची माहिती दडपलेली दिसते, असं कपिल पाटील म्हणाले. मला खात्री आहे,उद्धव ठाकरे हेच त्या स्वभावाचे नाहीत... त्यांना अभ्यंकर यांना उमेदवारी देऊन चूक झाली असा वाटतं असेल, असंही कपिल पाटील म्हणाले.
कपिल पाटील यांना अभ्यकरांचं उत्तर
कपिल पाटील यांनी केलेले आरोप बिन बुडाचे आणि कुठल्याही पुराव्याशिवाय केले आहेत. ५५ वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला मला अनुभव असून निवडणूक मी जिंकेल असा विश्वास असल्याचं ज. मो. अभ्यंकर म्हणाले.
ते पुढं म्हणाले की, फक्त प्रशासकीय अनुभव मला नाही तर मी सहा वर्षे शिक्षकाचे सुद्धा काम केलं आहे. शिक्षकांचे प्रश्न मला माहीत आहे आणि त्यासाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. संस्थांशी आणि मुख्याध्यापकांशी माझा थेट संबंध आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आणि शिक्षकांसाठी मला काम करायचंय.
कुठलेही प्रकारे पुरावा न देता बिन बुडाचे आरोप कपिल पाटील यांनी केले आहेत. आदर्श हाऊसिंग सोसायटीचा मी सदस्य आहे. पण, माझं सदस्यत्व कमिशन ऑन इंक्वायरी मध्ये स्पष्ट केलं आहे. माझं सदस्यत्व तिथे कायदेशीर आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमिता आढळून आलेली नाही. सीबीआय ईडी या सगळ्यांनी चौकशी यामध्ये केली, कुठल्याही प्रकारचा आक्षेप माझ्यावर यामध्ये घेण्यात आला नाही, असं ज.मो. अभ्यंकर म्हणाले. विधानपरिषदेत मुरब्बी अनुभवी आणि तज्ज्ञ लोक लागतात. 55 वर्षाचा मला या सगळ्यांमध्ये अनुभव आहे, मुंबईच्या इतिहासामध्ये पहिली अशी अनुभवी व्यक्ती निवडणुकीत उभी आहे, असंही अभ्यंकर म्हणाले.
मुंबई पदवीधरमधून ठाकरेंचे विश्वासू अनिल परब रिंगणात
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे अनिल परब मुंबई पदवीधर मधून निवडणूक लढवत आहेत. अनिल परब यांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वी ते मुंबई पदवीधर मधून विधानपरिषद निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केलं.
संबंधित बातम्या :
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?