''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर घोषणा झालेल्या राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांसाठी Election) आज मतदान पार पडत आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत असून सर्वच मतदारसंघात थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत आहे. मात्र, नाशिक (Nashik) मतदारसंघात अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारामुळे चौरंगी लढत होत आहे. याच विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज ठाकरे कुटुंबीय मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी, उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर भाष्य करताना, त्यांनी खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिली. त्यामुळे, राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असून यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ''उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे, सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे.उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयावर बोलेन,'' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांन चहापानांचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे ह्यांनी आज मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. pic.twitter.com/BEriLZkt4B
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 26, 2024
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरेंनीही महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना आमदारांची बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता बांद्रा ताज लँड हॉटेलला बैठक बोलवण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्यानं या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. लोकांचे कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा याबद्दल उद्धव ठाकरे बैठकीत सर्वच आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजते.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. राज्यात शतेकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असून सरकार गंभीर नाही. त्यामुळे, अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेल्या चहापान निमंत्रणावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे सांगण्यात आले.