हेल्मेट किंवा सीटबेल्ट वापरत नसाल तर ही बातमी वाचा... नियम मोडल्यास वाहनचालकांना मोठा दंड लागणार!
Maharashtra राज्यातील वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन (Maharashtra traffic rules and fine) करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा.
मुंबई : वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन (Maharashtra traffic rules and fine) करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. कारण हेल्मेट (helmet) किंवा सीटबेल्ट (seatbelt) नसेल तर तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल करण्यात आलीय. विनाहेल्मेट आढळणाऱ्या दुचाकीस्वारांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्दही केला जाणार आहे. या नवीन नियमांबाबतची नोटीस सोमवारी येणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा 2019 अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास आणि किंवा 10,000 रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास 2 वर्षे तुरुंगवास आणि किंवा 15,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. अर्थात अजून याबाबतचे अधिकृत आदेश आलेले नाहीत.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं आहे की, परिवहन कायद्यांच्या काही नियमांच्या दंडामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाची अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी तसेच अपघात कमी करण्यासाठी लागू करण्यात येणार आहेत, असं परब यांनी सांगितलं आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना 1000 रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास, परमिटशिवाय वाहन चालविल्यास 2000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो, अशीही माहिती आहे.