Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं काय होणार? अनिल परब स्पष्ट बोलले...
Maharashtra Politics Shivsena: शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असून आम्ही पर्यायी जागा शोधली नसल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले.
Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे (Shivsena Dasara Melava) भवितव्य आता हायकोर्टाच्या (Bombay High Court) हाती असताना शिवसेना नेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) (Shivaji Park) मेळावा घेण्यास आम्हाला आडकाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला आतापर्यंत सात वेळा हायकोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. आताही हायकोर्ट पुन्हा परवानगी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेने पर्यायी जागा पाहिली नसल्याचे परब यांनी सांगत दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अनिल परब यांनी म्हटले की, उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सध्या सुरू असलेला प्रकार हा दसरा मेळाव्याला अपशकून करण्याची वृत्ती आहे. वर्ष 1966 पासून दसरा मेळावा होत आहे. आता यामध्ये आडकाठी केली जात आहे. दसरा मेळाव्यासाठी विविध प्रकरणात आम्हाला सातवेळा हायकोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. कोर्टात उद्या युक्तिवाद होईल. आम्हाला आम्हाला दसरा मेळाव्यासाठी कोर्टातून परवानगी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगत शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाकारली आहे. त्यावरही परब यांनी टीका केली आहे. संघर्षाच्या ठिणग्या फक्त दादरमध्ये झडतात का असा सवाल त्यांनी केला. वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचा मेळावा आहे. मग, त्याच वांद्रेत मातोश्रीदेखील आहे असे सांगत परब यांनी महापालिकेच्या निर्णयाच्या विसंगतीवर बोट ठेवले.
शिवसेनेला ओरखडादेखील नाही
बुधवारी नेस्को मैदानात मुंबईतील शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याने शिवसेनेला ओरखडा पडलेला नाही हे सिद्ध झाले असल्याचे परब यांनी सांगितले. गटप्रमुखांच्या मेळाव्याला झालेल्या गर्दीने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे परब यांनी म्हटले.
रिसॉर्टशी संबंध नाही
दापोली रिसॉर्टशी माझा संबंध नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले. या प्रकरणात सर्व चौकशी झाली आहे. कोर्ट आदेश देईल ते बंधनकारक आहे. आम्ही किरीट सोमय्याला बंधनकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. सदानंद कदम हे त्या रिसॉर्टचे मालक असून तेच याबाबत बोलतील असे सांगत आमच्या बदनामीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे परब यांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ: Anil Parab Full PC on Dasara Melava 2022 : कोर्टाकडून परवानगी मिळेल याची आम्हाला खात्री