Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव
Shivsena Chief Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतरचा अनुभव सांगितला आहे.

Shivsena Chief Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीमधील (Uddhav Thackeray Interview) आज पहिला भाग प्रसारीत झाला. या मुलाखतीत त्यांनी बंडखोरीसह इतर मुद्यांवर भाष्य केले. शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा एक अनुभव उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुलाखतीत सांगितला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 'गोल्डन अवर'मध्ये शस्त्रक्रिया झाल्याने बचावलो असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे राजकारणात सक्रिय नव्हते. त्यावेळी भाजपने त्यांच्यावर निष्क्रिय असल्याचा आरोप केला होता.
शिवसेना नेते आणि 'दैनिक सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतरचा अनुभव सांगितला. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं. सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जेव्हा मी तुम्हाला (बंडखोरांना) पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात हालचाली केल्या असल्याचे घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

