Shivsena Dasara Melava: शिवसेनेला परवागनी न मिळण्यासाठी BMC वर सरकारचा दबाव? विनायक राऊतांनी स्पष्टच सांगितले
Shivsena Dasara Melava: शिवसेना दसरा मेळाव्यासाठी आधी परवानगी देतो म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आता टाळटाळ सुरू असल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
Shivsena Dasara Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC)अद्यापही परवानगी न दिल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) परवानगी न देण्यामागे राजकीय दबाव असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत (Shivsena MP Vinayak Raut) यांनी केले. शिवसेनेच्यावतीने दसरा मेळाव्यासाठी परवानगीचा अर्ज दिल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना परवानगी देणार असल्याचे म्हटले. मात्र, दुसऱ्या दिवसापासून अडचणींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला मोठं महत्त्व आहे. मात्र, आम्हीच खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून आता दसरा मेळावादेखील हायजॅक करण्याची तयारी सुरू झाली असल्याची चर्चा रंगत आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले की, पारंपरिक दसरा मेळावासंबंधी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागणारे पत्र गेलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आधी सकारात्मक भूमिका दाखवली. मात्र, दुसऱ्या दिवसानंतर अडचणींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. राजकारणाची एक हद्द असते. मात्र, सध्या राजकारणाची हद्द पार होताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही मेळाव्यासाठी पहिला अर्ज केला आहे. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा परवानगी मिळायला हवी. महापालिकेने यात कुचराई करू नये, असेही राऊत यांनी म्हटले.
महापालिका माझ्या पत्राची प्रतिक्षा करत असेल त्यामुळे त्यांनी दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत विचार केला नसेल असे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटले होते. मात्र, महापालिकेकडून परवानगी ही शिवसेनेच्या लेटरहेडवर मिळत होती. सदा सरवणकर यांचे हे अज्ञान असल्याचा टोलाही राऊत यांनी लावला.
गणेशभक्त त्या पैशांना हात लावणार नाही
शिंदे गटाच्या आमदारांनी खोके कमावले आहेत. त्यांना ते खर्च करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांच्याकडून उधळपट्टी होणार हे जनतेला माहीत आहे. मात्र, या हरामाच्या पैशाला गणेशभक्त हात लावतील असे वाटत नसल्याचे राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे. शिवसेना नेमकी कोणाची? हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.