(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Threat Call : मुंबईत तीन अतिरेकी, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन; पोलीस यंत्रणा अलर्ट
Terrorists in Mumbai : या फोन कॉलने मोठी खळबळ उडाली असून, मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे.
Mumbai Threat Call : मुंबईमधून (Mumbai) धक्कादायक बातमी समोर येत असून, मुंबईमध्ये तीन दहशतवादी (Terrorists) आल्याची माहिती देणारा फोन कॉल मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. दुबईवरुन शुक्रवारी (7 एप्रिल) पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आल्याचं आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा कॉलरने दावा केला आहे. या फोन कॉलने मोठी खळबळ उडाली असून, मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. तर पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आला आहे. दुबईवरुन शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. तर एकाचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर देखील पोलिसांना संबंधित कॉलरकडून देण्यात आला आहे. तसेच या तीनही व्यक्तींचा दोन नंबरचा धंदा असल्याचा दावाही कॉलरने केला आहे. त्यामुळे पोलिसांकडून या संबंधी चौकशी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण...
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला येणाऱ्या फोन कॉलची तपासणी पोलिसांकडून करण्यात येते. दरम्यान शुक्रवारी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीने फोन करुन मुंबईत तीन दहशतवादी आल्याची माहिती दिली. तसेच हे तीनही व्यक्ती दुबई येथून आले असून, त्यांचा संबध पाकिस्तानशी असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीने एक विशेष नाव आणि नंबर देखील दिला आहे. सोबतच एका गाडीचे नंबर देखील दिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना सतत असे फोन येत असून, पुढे तपासात फोन करणारे व्यक्ती मनोरुग्ण किंवा एखाद्या व्यक्तीशी बदला घेण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फोनबाबत देखील असेच काही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरु...
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षेत एका व्यक्तीने फोन करुन मुंबईत दहशतवादी आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित फोन कॉल गांभीर्याने घेत, संबंधित व्यक्ती, मोबाईल नंबर आणि गाडीचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांचे काही पथक नियुक्त करण्यात आले असून, हे पथक संबंधित माहितीची खात्री करत आहेत. मात्र हा फोन कॉल खरा आहे की, फेक कॉल आहे हे आता पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
इतर महत्वाची बातमी: