Covid Center | पालघरमधील कोरोना सेंटरमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता, रुग्णांचे हाल
पालघरमधील कोविड सेंटरमध्ये आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळाअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रिवेरा कोविड सेंटरचा रुग्णांना खूप मोठा आधार झाला. परंतु त्यानंतर सरकारने लक्ष काढून घेतल्याने आणि या रुग्णालयात काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे मानधन थकल्याने आपोआपच मनुष्यबळ कमी झालं, त्याचा परिणाम आता आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर पाहायला मिळत आहे.
पालघर : सध्या देशभरात कोरोना संसर्गाची स्थिती भयानक बनत चालली असून दुसऱ्या लाटेत आलेल्या कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. पालघर जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही कोरोनाने विळखा घातला असून आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळाअभावी रुग्णांचे हाल होऊन जीव जायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा फैलाव सुरु असून दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. सध्या कडक लॉकडाऊन असूनही रुग्ण संख्या सातत्याने वाढतच आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील रिवेरा कोविड सेंटर हे ग्रामीण भागासाठी आशेचा किरण मानलं जात होतं. आधीच्या लाटेमध्ये या सेंटरचा रुग्णांना खूप मोठा आधार झाला. परंतु त्यानंतर सरकारने लक्ष काढून घेतल्याने आणि या रुग्णालयात काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे मानधन थकल्याने आपोआपच मनुष्यबळ कमी झालं, त्याचा परिणाम आता आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर पाहायला मिळत आहे. रिवेरा कोविड सेंटर हे 250 खाटांचे असलं तरी या ठिकाणी विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू, तलासरी या भागातून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दाखल होतात. परंतु ज्या ठिकाणी या रुग्णांची देखभाल आणि उपचार करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने त्याचा विपरीत परिणाम दाखल असलेल्या रुग्णांवर होत आहे. खरंतर दाखल झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे, परंतु येथे काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने या रुग्णांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अतिसंवेदनशील असलेले रुग्ण दगावण्याचं प्रमाणही वाढले आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर विक्रमगडमधील रिवेरा, डहाणूमधील उपजिल्हा रुग्णालय, जव्हारमधील पतंग शहा कुटीर रुग्णालय, धुंदलवाडीमधील वेदांत मेडिकल कॉलेज, बोईसरमधील टिमा रुग्णालय कोविड सेंटरवरती रुग्णांचा मोठा भार आहे. मात्र येथे ही सुविधा अपूर्ण पडत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.
आजच्या घडीला पालघर ग्रामीणमध्ये साध्या बेडची संख्या 785, ऑक्सिजन बेड 541, आयसीयू बेड 132, व्हेंटिलेटर बेड 72 अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत असल्याने काही रुग्णांना या सुविधा मिळत नाही त्याचा परिणाम थेट जीव गमावण्यावर येत आहे.
तर अजूनही रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून जिल्हा प्रशासन कसोशीने या बाबीकडे लक्ष देऊन पूर्तता करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असले तरीही प्रयत्न तोकडे पडत असल्याचेही चित्र आहे.
प्रतिक्रिया
जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्या वाढत असताना आपण खाटांची क्षमता, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्यातरी स्थिती नियंत्रणात असून नंतर स्थिती गंभीर बनेल हे नाकारता येत नाही. त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना आखून प्रयत्नशील आहोत, असं पालघरचे उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी म्हटलं आहे.
























