Pravin Darekar : मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड; राज्यातील सत्तांतरानंतर बँकेतही सत्तांतर
Pravin Darekar : राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई बँकेतही सत्तांतर झाले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Pravin Darekar : भाजप नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांची मुंबई बँकेच्या (Mumbai) अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रवीण दरेकर यांना अध्यक्षपद गमवावे लागले होते आता, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचा परिणाम आता दिसू लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मुंबई बँकेमध्ये सत्तांतर झाले आहे. सहकार क्षेत्रात मुंबई बँक ही प्रमुख बँकेपैकी एक असून प्रवीण दरेकर यांचे या बँकेवर वर्चस्व आहे. मात्र, मागील निवडणुकीत पॅनेलला चांगले यश मिळूनही दरेकर यांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले होते. मुंबई बँकेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
प्रविण दरेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवर असलेली सत्ता महाविकास आघाडीने खेचून घेतली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या वेळच्या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँगेसच्या सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली होती तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली होती. प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली असल्याचा ठपका सहकार विभागाने ठेवला होता. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते दूर होते.
काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबई बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबई बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबई बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.