बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे. कारण, प्रथमच मुंडे बहिण भाऊ एकत्रित येऊन येथे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साहेबराव देशमुख यांचे त्यांना आव्हान आहे. येथील मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी हा सामना होत असून तब्बल 40 वर्षानंतर प्रथमच येथे भाजपचे कमळ निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर दिसून येत नाही. त्यामुळे, यंदाची निवडणूक ही अत्यंत उत्कंठावर्धक होत आहे. लोकसभा निवडणुकीत येथे पंकजा मुंडेंचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) विजयी झाले होते. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत. तसेच, धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोलही करत आहेत. आता, त्यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay munde) टीका करताना थेट भुताची उपमा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. राक्षस, रावणनंतर धनंजय मुंडे यांच्यावर बजरंग सोनवणेंनी जोरदार हल्लाबोल करत त्यांना चक्क भुताची उपमा दिली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी गाव भेट दौऱ्यादरम्यान सोनवणेंनी धनंजय मुंडेंवर बोचरी टीका करत लक्ष्य केलं.
परळी मतदारसंघात दहशत दादागिरी चालू आहे, ती बंद करायचे असेल तर ओपन व्यासपीठ केलं पाहिजे. खासदार बजरंग सोनवणे तुमच्यासोबत आहे, त्यामुळे घाबरू नका. कुणी तुमच्यावर वाकड्या नजरेनं आला, तर मी दुसऱ्या मिनिटाला तुमच्याकडे येतो, असे म्हणत सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यापूर्वी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी धनंजय मुंडेंना राक्षस, रावण ही उपमा दिली होती. आता परळी या बालेकिल्ल्यात जाऊन सोनवणेंनी धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा दिली. हा उमेदवार पठ्ठ्यासुद्धा आम्ही इथंच ठेवणार आहोत. तिकडे परळी अंबाजोगाईत बघू काय ते, आम्ही आमच्या केज मतदारसंघात ते भूत येऊ देत नाही. परळी विधानसभेतील अंबाजोगाईत एवढी दादागिरी येऊ दिली नाही. आम्हाला ही भीती आहे की हे भूत केज मतदार संघात कधी शिरते, त्यामुळे आम्ही तिथून सुद्धा हद्दपार करून टाकलं आहे आणि आता इथे तुम्ही हद्दपार करणार असल्याचे म्हणत सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
जे मतदान करत आहेत, ते तरी तुम्हाला खरं वाटतंय का, म्हणजे शाई तुमच्या बोटाला लावयची आणि बटण त्यांनी दाबायचं. पण आता मी बरोबर बटणं दाबले आहेत, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना थेट इशारा दिलाय.
हेही वाचा
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं