Mumbai Corona Update : गुरुवारच्या तुलनेत मुंबईतील रुग्णसंख्येत घट; 1898 नवे कोरोनाबाधित
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांपासून कोरोनारुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. पण गुरुवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. कालपेक्षा 581 कमी रुग्ण आज आढळले आहेत.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. बऱ्याच काळापासून आटोक्यात आलेल्या रुग्णसंख्येने आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. पण गुरुवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट आढळून आली आहे. गुरुवारी 2479 नवे बाधित आढळले होते तर आज 1898 नव्या बाधितांची नोंद झाल्याने 581 कमी नवे बाधित आढळल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पण रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 1 हजार 898 नवे कोरोनाबाधित आढळले असून 2253 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दरही वाढत असल्याने चिंतेचं कारण आणखी वाढलं आहे. 386 दिवसांवर आता हा दर पोहोचला आहे.
राज्यात 4205 नवे कोरोनाबाधित
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 4205 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात आज 3752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,81,232 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.82 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्यानेराज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के इतका झाला आहे. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या आषाढी वारी सुरू असून लाखो भाविक भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. मात्र, त्याच वेळी राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली असून दोन महिन्यांपूर्वीच्या केवळ 626 सक्रिय रुग्णांवरून ही संख्या 25 हजारा पर्यंत पोहचली आहे.