'किती नर आणि किती मादी डास सापडले?' आधी अजित पवार आता छगन भुजबळांकडून आरोग्यमंत्र्यांची फिरकी
अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रश्नांची सरबत्ती करुन तानाजी सावंतांना दुसऱ्या दिवशी अडचणीत आणले होते. आज तिसऱ्या दिवशी छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली.
Maharashtra Monsoon Session LIVE : सभागृहात आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची पहिल्याच दिवशी दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रश्नांची सरबत्ती करुन सावंतांना दुसऱ्या दिवशी अडचणीत आणले होते. आज तिसऱ्या दिवशी छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली? या प्रश्नावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले आणि डास घनता काढली असे उत्तर दिले होते.
यावर प्रश्न विचारताना छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का? असे प्रश्न विचारत आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. तानाजी सावंत यांनी यावर उत्तर देताना याचा सविस्तर अहवाल टेबल केला जाईल, असं म्हटलं
दुसऱ्या दिवशीही आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली होती. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नव्हते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला होता.
अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नव्हते आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. याचं उत्तर आज सावंतांनी दिलं.
तान्हाजी सावंत यांनी सांगितलं की, पालघर जिल्हात 31 पदं रिक्त आहेत. 2021 ला निधी प्राप्त झाला, मात्र खर्च झालेला नाही. पालघरमध्ये 97 टक्के खर्च झाला आहे. यावर रविंद्र वायकर यांनी प्रश्न केला की, डीईसी गोळीला सरकारने बंदी घातली आहे. तरीही गोळी का दिली जात आहे. याची माहिती मिळावी. याला उत्तर देताना सावंत म्हणाले की, डीईसी गोळी दिली जाते. या गोळीवर बंदी नाही. हत्ती रोग संदर्भात पालघर जिल्हात जाणीवजागृती केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक; अजित पवारांची फुल बॅटिंग!