राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची केंद्राकडे मागणी : गृहमंत्री
राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय सततच्या कामाच्या ताणामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. यासाठी राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात, अशी मागणी केंद्राकडे केल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) वीस कंपन्या म्हणजेच 2000 केंद्रीय पोलिसांची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.
"कैक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कामाची वेळ आणि आव्हानंही दिवसागणिक वाढत आहेत. शिवाय रमजान ईदही येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची मागणी केंद्राकडे केली आहे," असं अनिल देशमुख म्हणाले.
कैक पोलीसांना कोरोनाची लागण झालीय, त्यांच्या कामाची वेळ व आव्हानंही दिवसागणिक वाढतायत व रमज़ान ईद ही येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची केंद्राकडे मागणी केली आहे.#MaharashtraGovtCares pic.twitter.com/Lyzr1i6aCT
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 13, 2020
महाराष्ट्रात 1000 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण, सात मृत्युमुखी
सध्या राज्य राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या 32 कंपन्या पोलीस दलाच्या मदतीला आहेत. मात्र सततच्या कामाच्या ताणामुळे पोलिसांनाही विश्रांतीची गरज आहे. ही बाब लक्षात घेता राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात, अशी मागणी केल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील एक हजारापेक्षा जास्त पोलीस कोरोनाग्रस्त राज्यात कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील तब्बल एक हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झआली आहे. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे पोलीस फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. परंतु या कोरोना योद्ध्यांमध्येच संसर्ग झाल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील पाच आणि पुणे, नाशिक, सोलापूर पोलीस दलातील प्रत्येकी एका पोलिसाने प्राण गमावले आहेत.
Coronavirus | कोरोना योद्धेच व्हायरसच्या विळख्यात, महाराष्ट्रातील 531 पोलीस कोरोनाबाधित
मुंबईत पोलिसांवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, दोघे जखमी; मरिन ड्राईव्हवरील थरारक घटना
आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मुंबई पोलीस दल - वाकोला पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर
मुंबई पोलीस दल - हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे
मुंबई पोलीस दल - कुर्ला वाहतूक विभाग, पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे
पुणे पोलीस दल - फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे
सोलापूर पोलीस दल - एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख
मुंबई पोलीस दल - विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन, सुनील दत्तात्रय करगुटकर
नाशिक पोलीस दल - पोलीस मुख्यालय, हेड कॉन्स्टेबल साहेबराव झिपरु खरे
मुंबई पोलीस दल - शिवडी पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर वाघमारे