![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Conjunctivitis Eye Infection : राज्यात डोळ्यांचा संसर्ग बळावला, गुरुवारपर्यंत जवळपास 4 लाख बाधितांची नोंद
Conjunctivitis: डोळे आल्यानंतर रुग्णांनी जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय येथे संपर्क साधून उपचार घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
![Conjunctivitis Eye Infection : राज्यात डोळ्यांचा संसर्ग बळावला, गुरुवारपर्यंत जवळपास 4 लाख बाधितांची नोंद Maharashtra eye infection Conjunctivitis patient found nearly 4 lakhs in Maharashtra State said Health Department Conjunctivitis Eye Infection : राज्यात डोळ्यांचा संसर्ग बळावला, गुरुवारपर्यंत जवळपास 4 लाख बाधितांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/06/3a2ee99e253744de8357bb5790d457381691307986888322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्यात डोळ्यांचा संसर्ग (Conjunctivitis) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. डोळे येणे या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी, 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुलढाण्यात 44 हजार 398 रुग्ण आढळले आहेत. तर, पुण्यात देखील 30 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात सर्व्हेक्षण सुरू आहेत. हात धुणे, व्यक्तिगत स्वच्छता ठेवणे आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार योग्य उपचार घेण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांना आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप तयार करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ सुरू झाली आहे. त्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहे.
डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे. जास्तीत जास्त चार दिवस हा आजार राहतो. त्यामुळे आकडेवारी जरी मोठी दिसत असली तरी यातील मोठी संख्या आहे जे ह्या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
सर्वाधिक रुग्ण संख्या असणारे महत्त्वाचे जिल्हे :
सर्वात जास्त 44398 रूग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत. त्यानंतर पुणे 30063, जळगाव 24654, नांदेड 22860, चंद्रपूर 16799, अमरावती 16068, परभणी 16005, अकोला 14270, धुळे 13398, वर्धा 12088, नंदुरबार 11405, भंडारा 10054, वाशिम 9542, यवतमाळ 10901, नांदेड मनपा क्षेत्र 8823, मालेगांव जि. नाशिक मनपा 9136, लातूर 8153 इतके रुग्ण आढळले आहेत. नाशिक मनपा विभागात 4540 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 3152 रुग्ण आढळले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत 544 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
डोळे येण्याची लक्षणे-
1. डोळे लाल होणे.
2. वारंवार पाणी गळणे.
3. डोळयाना सूज येणे.
4. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
5. डोळ्याला खाज येते.
6. डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.
डोळे आल्यास अशी काळजी घ्या
1. डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.
2. इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये.
3. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
4. घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
5. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.
6. आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
7. शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.
8. डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा.
9. डॉक्टाराच्या सल्यानुसारच औषधं डोळ्यात टाकावी.
इतर संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)