(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फडणवीसांचा पेनड्राइव्ह बॉम्ब; आज विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून बचाव की आक्रमक भूमिका?
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर आज विधीमंडळात सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
Maharashtra Assembly Session 2022 : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर आज बुधवारी विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष लागले आहे. फडणवीसांच्या आरोपांवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सभागृहात उत्तर देण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला.
फडणवीस यांच्या आरोपानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया नोंदवली. त्यामुळे आता सरकार बॅकफूटवर गेले असल्याची चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी केलेल्या आरोपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री असल्याने आज सभागृहात नेमकं काय उत्तर देतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
फडणवीस काय म्हणाले ?
सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं ठिकाण आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण?
जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, "गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या", अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: