तोंडी परीक्षा | राज ठाकरेंच्या भाषणांचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही : पंकजा मुंडे
चिक्की घोटाळ्यांच्या आरोपावंर बोलताना, चुकीचे आरोप झाल्यावर त्रास होतो, अशी वेदना पकंजा मुंडेंनी व्यक्त केली.
मुंबई : ज्यांनी जनतेची काहीच कामे केलेली नाहीत, अशा लोकांचं जनता का ऐकणार, असा टोला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे राज ठाकरेंना लगावला. पंकजा मुंडे एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या निवडणूक विशेष कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
राज ठाकरे आपल्या सभांमध्ये व्हिडीओ दाखवून भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत आहेत. राज ठाकरेंच्या भाषणांमुळे भाजपला मोठा फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज ठाकरे आमच्यासाठी अजिबात आव्हानात्मक नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
राज ठाकरेंच्या सभेचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी
आम्ही काय करु शकलो असतो आणि कुठे कमी पडलो यावर बोलणं ठीक आहे. मात्र ज्यांनी लोकांची काहीच कामे केलेली नाहीत. लोकांना दाखवण्यासारखी ज्यांच्याकडे कामे नाहीत, ते आमच्याविषयी बोलत आहेत. मात्र त्यांच्याकडून आमच्या पक्षाचा प्रचारच होत आहे, असं पंकजा मुडे राज ठाकरेंना उद्देशून म्हणाल्या. राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषणाची मज्जा लुटण्यासाठी लोक त्यांच्या सभेला गर्दी करत असतील. मात्र त्यांच्या सभांचा भाजपच्या मतांवर काही परिणाम होणार नाही, असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडेंही घराणेशाहीचे प्रतिक
धनंजय मुंडेंनी घराणेशाहीवरुन प्रीतम मुंडेवर केलेल्या टिकेलाही पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं. आज तुम्ही घराणेशाहीवर बोलत आहात, त्या घणारेशाहीचे तुम्हीही प्रतिक आहात. मुंडे साहेबांनी (दिवंगत गोपीनाथ मुंडे) ज्यावेळी तुम्हाला विविध पदे दिली, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट नाही आठवली का? असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला. तुम्हाला एखादी जबाबदारी, पद दिलं म्हणजे ती तुमची योग्यता आहे आणि इतर कोणाला उमेदवारी मिळाली की ती घराणेशाही कशी होते? अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली.
चिक्की घोटाळ्याच्या आरोपांचा त्रास होतो
चिक्की घोटाळ्यांच्या आरोपावंर बोलताना, चुकीचे आरोप झाल्यावर त्रास होतो, अशी वेदना पकंजा मुंडेंनी व्यक्त केली. आरोप करताना ज्यांनी आरोप केले आणि ज्यांच्यावर आरोप झालेत यांना सत्य माहित असतं. मात्र सत्य काय हे जगाला कळत नाही. लोकांना चर्चा करायला आवडते, मात्र सत्य पडाळत जात नाही. मात्र माझ्यावर झालेले सर्व आरोप मी खोडून काढले आहेत.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, साध्वी प्रज्ञा सिंह पक्क्या राजकारणी नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा हेतू मला माहित नाही. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
'मैं भी चौकीदार' मोहिमेनंतर सर्वच भाजप नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावासमोर 'चौकीदार' लिहिलं आहे. मात्र पंकजा मुंडेंनी त्यांच्या नावासमोर लिहिलेलं 'चौकादार' का काढलं याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मी नावापुढे चौकीदार लिहिल्यानंतर मला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली. मात्र मैं भी चौकीदार मोहिमेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी मी माझ्या नावासमोरील चौकीदार काढून टाकलं, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
संबंधित बातम्या
तोंडी परीक्षा | पार्थ पवारांनी आजोबा, आत्याला कर्ज दिलं; सुप्रिया सुळे म्हणतात...
तोंडी परीक्षा | सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ, तो जिंकणारच, राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास
तोंडी परीक्षा | प्राध्यापक भरती प्रक्रिया सरकारी अधिकाऱ्यांमुळे रखडली, विनोद तावडेंचा आरोप