Avinash Jadhav Protest: लोढा बिल्डरकडून हजारो ग्राहकांची फसवणूक, मनसेचा मोठा आरोप; अविनाश जाधवांचे ठाण्यात आंदोलन
Avinash Jadhav Protest: मनसेने व्यावसायिकाच्या विरोधात विविध आशयाचे फलक हातात घेतले होते. यावेळी फसवणूक झालेले ग्राहकांसमोर त्यांनी लोढाच्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी जाब देखील विचारला.

ठाणे- ठाणे शहरातील कोलशेत भागात लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी पैसे गुंतवले होते. यातील काही ग्राहकांचे बँकेचे कर्ज मंजूर झाले नसल्यामुळे त्यांनी घरांची नोंदणी रद्द करुन सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली. परंतु या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांचे पैसे परत करण्यास विरोध केला. त्यामुळे लोढा या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी आज (गुरुवारी) आंदोलन केलं. यावेळी मनसेने व्यावसायिकाच्या विरोधात विविध आशयाचे फलक हातात घेतले होते. यावेळी फसवणूक झालेले ग्राहकांसमोर त्यांनी लोढाच्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी जाब देखील विचारला.
तर याच प्रकरणात लोढा बिल्डरकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणी जे आरोप होत आहेत ते फेटाळण्यात आले आहेत.
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाने घरे बुक केली त्यांनी लाखो रुपये ऍडव्हान्स म्हणून दिले, पण लोन मंजूर न झाल्यामुळे घराची बुकिंग रद्द करण्याची विनंती मनसे तर्फे बिल्डरला करण्यात आली, बिल्डर याने लोकांनी भरलेले लाखो रुपये परत करण्यास विरोध केला, त्यानंतर आज लोढा बिल्डरच्या विरोधात मनसेने आंदोलन केले.
गणेश भोईर नावाचा एक रिक्षा चालक...
यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी बोलताना म्हटलं की, लोढा बिल्डर हजार मराठी तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक आकर्षित ऑफर तयार करतात आणि गरिबांसाठी स्वस्तात घर आणि अशाप्रकारे वेगवेगळ्या ऑफिस काढतात. गणेश भोईर नावाचा एक रिक्षा चालक आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी फ्लॅट बुक केला आणि तीन लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्यांनी लोनसाठी प्रोसेस केली आणि त्याचा लोन मंजूर झाला नाही आणि तो बुकिंग रद्द करायला आला तर त्यांनी सांगितलं की, तुमचे जे काही पैसे आहे ते तुम्ही कट करा आणि बाकीचे काही पैसे परत करा. मागील दोन वर्षांपासून त्याला बिल्डर कडून पैसे येत नाही. काल त्याला सांगितलं की तुला पैसे मिळणार नाही जे करायचे ते कर.
लोढा हे मंत्री असल्यामुळे नागरिकांची
पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, आणखी एक केतकी नावाची मुलगी आहे, त्याचा देखील हॉटेलचा व्यवसाय होता आणि आई -वडील नसलेली ती मुलगी आहे. तिने देखील पंधरा लाख रुपये भरले आणि तिला दहा लाख रुपये परत देण्यात आले. आम्हीसोबत असल्यामुळे त्याचे पाच लाख रुपये कट करण्यात आले. नाईक आणि पंडित नावाच्या महिला आहेत, त्यांनी देखील दोन कोटी आठ लाखाचं घर घेतलं. त्याला 65 लाखाचा रुपये दंड आकारला गेला आहे. अशा हजारो केस बिल्डरच्या विरोध आहे. बिल्डर पैसे परत करत नाही. अशा अनेक तक्रारी बिल्डरच्या विरोधात आमच्याकडे नागरिक घेऊन येत असतात. लोढा हे मंत्री असल्यामुळे नागरिकांची दखल घेतली जात नाही. रिक्षा चालक गणेश त्याचे पैसे परत मिळावे यासाठी एका वर्षापासून पाठपुरावा करत आहे. त्यांना अजून कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग दिलेला आहे. त्या मार्गाचा वापर करून आम्ही आंदोलन करत आहोत.
आम्ही लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढणार म्हणजे काढणार
जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही.65 लाख रुपये दंडाची महिला कसा भरतील? रेराचां कायदा आहे की बुकिंग रद्द केल्यावर पूर्ण पैसे मिळतील. बिल्डर पैसे परत करत नाही. हा एका बिल्डरचा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मधील बिल्डराचा हाच विषय आहे. नाव मोठे दर्शन खोटे. आमच्या गणेशने तीन लाख रुपये दिले आहेत आणि तो सकाळी आठ वाजता रिक्षा काढून सायंकाळी सात पर्यंत रिक्षा चालवतो, तेव्हा त्याला एक हजार रुपये मिळतात आणि आता भागिले तीन लाख रुपये करा आणि त्याचे तीनशे दिवसची महिन्याचे पैसे आम्ही खाऊन देणार नाही. त्या रिक्षा चालकाला तीनशे दिवस लागेल तीन लाख रुपये कमवायला. आम्ही लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढणार म्हणजे काढणार, असं म्हणत अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लोढा समूहाने आरोप फेटाळले
या प्रकरणात लोढा बिल्डरकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय की, आंदोलकांनी केतकी नावाच्या महिलेचा उल्लेख केला त्या महिलेने तिचा फ्लॅट रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. त्या महिलेला आम्ही RERA नुसार रक्कम परत केली आणि तिने आम्हाला फायनल सेटलमेंट लेटर देखील दिले. तिच्याकडे फ्लॅटच्या संदर्भात असलेले अधिकार हे संपुष्टात आले आहेत असं त्या पत्रात लिहिलं आहे. या महिलेने आम्हाला 22 ऑगस्ट 2024 रोजी हे पत्र दिले होते.
या प्रकरणी आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू असंही लोढा समूहाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
























