(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला 'नो एन्ट्री', नोकरीच्या व्हायरल पोस्टमुळे महाराष्ट्रात संताप, ट्रोल होताच उपरती
Mumbai : Linkedin वर ग्राफिक डिझायनरची जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं
Mumbai : Linkedin वर ग्राफिक डिझायनरची जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. लिंक्डिनवरील ही जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालीये . एचआर जान्हवी सराना या नावाने लिंक्डिनवर एक जाहिरात करण्यात आली. त्यामध्ये मुंबईत (Mumbai) ग्राफिक्स डिझाईनसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गिरगावात नोकरीसाठी करण्यात आली होती जाहिरात
महत्त्वाचं म्हणजे मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातील एका कार्यालयात ही नोकरी होती. तरीही या नोकरीच्या जाहिरातीत मराठी लोकांनी येथे अर्ज करू नये असं सांगण्यात आलं. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित एचआर व्यक्तीने ही पोस्ट डिलिट केली आहे. तसंच, माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पोस्ट व्हायरल झाल्याने सर्वांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे एचआरवर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
आम्हाला ग्राफिक्स डिझाईनरची गरज आहे. मुंबईतील गिरगावमध्ये नोकरीची संधी असणार आहे. 1 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी वर्षाला 4.8 लाखांचे मानधन देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी अडॉब फोटोशॉप, अडॉब इलुस्ट्रेटर, टायपोग्राफी इत्यादी हाताळण्यात पारंगतता असायला हवी. मात्र, मराठी लोकांचे या नोकरीसाठी स्वागत करण्यात येणार नाही, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते.
व्हायरल पोस्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप
LinkedIn वरिल ही जाहिराता पाहाता पाहाता संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जाऊ लागला. नेटकऱ्यांनी Linkedin सह सर्व प्लॅटफॉर्मवरती ट्रोलिंग सुरु केल्यानंतर एचआरवर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील मराठी लोकांना दुय्यम वागणूक कशामुळे असा सवाल नेटकरी विचारू लागले आहेत.
मुंबईतील प्रकारावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
मुंबईतील गिरगाव मध्ये ज्या फ्री लांसर कंपनीने मराठी माणसांना नोकरी साठी अर्ज करू शकत नाही, अश्या पद्धतीचा सोशल माध्यमावर मेसेज व्हायरल केला. त्या कंपनी ची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहिती आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. अशी पोस्ट टाकता येते का ते? तपासून पाहायला सांगितल जाईल. आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं असताना अशा पद्धतीची पोस्ट टाकता येते का याची माहिती मागवली जाईल. अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील, आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू पण असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar on Dattatray Bharne : शेतीचं पाणी बापजाद्याची इस्टेट नाही, अरे मामा जपून , तुझं सगळं काढायला वेळ लागणार नाही, शरद पवारांचा भरणे मामांवर हल्लाबोल