यंदा लालबागच्या राजाचा गणपती नाही; लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाला होणारी भाविकांची गर्दी पाहता मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच राज्यातील सर्व सण उत्सवांवरही कोरोनाचं सावट आहे. दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीनं घेतला आहे. तर अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या मोठ्या मूर्ती न बसवता लहान मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोना संकट असल्यानं मंडळायाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यसेवा साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. 11 दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. तसेच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळानं ऐतिहासिक निर्णय घेत आरोग्यसेवा करणार असल्याचं सांगितलं आहे. लालबागच्या राजाची ख्याती खुप मोठी आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, क्रेिकेटपटू या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. एवढचं नाहीतर देशविदेशातून लोकं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. पण यंदा हा उत्सव होणार नाही. गणेशोत्सवात लालबागमध्ये लाखो भाविक येत असतात गर्दीत कोरोनाची लागण असलेल्यांचा वावर आला तर कित्येकांना यांची लागण होऊ शकते आणि परिणामी शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढू शकतो तसेच कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढू शकतो त्यामुळेच सणासुदीला गालबोट लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मानद सचिव सुधीर साळवी म्हणाले की, 'दिवसेंदिवस मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची वाढत जाणारी संख्या सध्या चिंतेचा विषय बनला आहे. सध्या महापालिका प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. मागील 86 वर्षांपासून लालबागचा राजा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. परंतू यंदा अशी परिस्थिती नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सोव साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. 11 दिवस गणपती बाप्पाची उंच मुर्ती न बसवता 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरेपी उपक्रम आम्ही यंदा राबवणार आहोत. यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही तत्काळ 25 लाख रूपये जमा करणार आहोत. यासोबतच गलवान खोऱ्यात आणि पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणार आहोत. तसेच कोरोनाच्या लढाईत शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणार आहोत.'
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आवाहन केल्यानुसार आम्ही आरोग्य उत्सव साजरा करणार आहोत. प्लाझमा थेरपीसाठी आम्ही जेजे रुग्णालयासोबत काम करणार आहोत. जे नागरिक प्लाझमा थेरपीसाठी समोर येतील त्यांना जे.जे रुग्णालयात नेण्यात येईल आणि त्यांची संपूर्णपणे काळजी घेऊन प्लाझ्मा घेतला जाईल. मुंबईतील सर्व रुग्णालयांसाठी रक्तदान शिबिर घेणार आहोत.' असंही मानद सचिव सुधीर साळवी यांनी बोलताना सांगितलं.
देशासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असेलेल्या लालबागच्या राजाला 86 वर्षांची पंरपरा आहे. गेली 86 वर्ष लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा विराजमान होतो. 14 फुटी उंच आणि मनमोहक अशी बाप्पांची मुर्ती असते. नवसाला पावणारा म्हणून अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. एवढचं नाहीतर लाखोंचं दान, सोन्या चांदीचे दागिने लालबाग राजाच्या चरणी अर्पण केले जातात तसेच अनेक उद्योगपती, नेतेमंडळी आणि राजकारणी या लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात म्हणून देशभरात लालबागच्या राजाचं नाव प्रसिद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
यंदा मुंबईच्या राजाची मूर्ती 22 फुटांऐवजी 3 फूट, गणेश मंडळाचा मोठा निर्णय
गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात : मुख्यमंत्री
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन ऑनलाईन पद्धतीनेच प्रयत्न