गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात : मुख्यमंत्री
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश उत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावर्षी गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात, असा नारा त्यांनी दिलाय.
मुंबई : राज्यातील विविध सणसमारंभानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोरोना संसर्गाचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांशी संवाद साधला. लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे, पण ती सुरक्षित व्हायला पाहीजे. "मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळं, संकटं येत आहेत. मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परिक्षा आहे. विघ्नंहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय. त्यामुळे यंदा गणेशमूर्तीची उंची कमी करून आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात, असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करताना उद्धव ठाकरे काय म्हणाले?
- लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहीजे.
- गणेश मूर्तींची उंची हा प्रश्नं आहेच.
- जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहीजे.
- होळी नंतर हे संकट सुरू झालंय. त्यानंतर सर्वच धर्मियांनीही काळजी घेत सहकार्य केलंय.
- वारी आपण सुरक्षित पार पाडतोय तसंच आपण गणेशोत्सवही सुरक्षित पार पडला पाहीजे.
- गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच साकारावी. जेणेकरून सुरक्षेचे इतर प्रश्नंही सुटतील.
- विघ्नंहर्त्यांचे आशिर्वाद घेऊन आपण हे संकट दूर केलं पाहीजे.
'गणेशमूर्ती'ही मर्यादीत असावी
- उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या रहातील. त्यामुळे सुरक्षित उत्सव केला पाहीजे.
- गणेशमूर्तीची उंची मर्यादीत असावी जेणेकरून ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जीत करता येईल.
- या वर्षी आपल्या गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात.
- गणेशमूर्तींची उंची किती असावी या संदर्भात मी आपल्या सर्वांशी बोललोय. तसेच आता मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून पुढील दोन दिवसांत गणेश मूर्तींची उंची किती असावी हा निर्णय जाहीर करतो.
यंदाचा गणेश उत्सव साधेपणाने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेश उत्सव यंदा मात्र मर्यादीत स्वरुपात साजरा करावा लागणार आहे. राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक शहर, गावं, खेड्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, यंदा राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशावेळी काळजी घेतली नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळेचं सर्वांनीच गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
CM Uddhav Thackeray | कोरोनाचं संकट नष्ट होवो, मुख्यमंत्र्यांचं अंबाबाईला साकडं