(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत कष्टकऱ्यांचा एल्गार; आझाद मैदानात शेतकरी कामगार महापंचायत
Kisan Mahapanchayat : मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी-कामगार महापंचायत पार पडणार आहे.
Mahapanchayat Mumbai : संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं आहे. आझाद मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेत मजूर दाखल होत आहेत. मोदी सरकारनं मागे घेतलेले शेतकरीविरोधी कायदे संसदेत मागे घेतल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असं येथील उपस्थित शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोबतच शेतमालाला किमान हमी भाव देण्याची मागणी पुढे येत आहे. या महापंचायतीत हजारो कष्टकरी उपस्थित असणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतरही संयुक्त किसान मोर्चाने इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लखनऊ व इतर ठिकाणी किसान पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. आज, मुंबईत शेतकऱ्यांच्या महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.
राकेश टिकैत, हन्न मोल्ला, मेधा पाटकर करणार संबोधित
मुंबईतील शेतकरी महापंचायतीत शेतकरी नेत्यांसह जनआंदोलनाच्या चळवळीचे नेते संबोधित करणार आहेत. यामध्ये राकेश टिकैत, दर्शन पाल, हनन्न मोल्ला, युद्धवीर सिंह, तजिंदर सिंह विर्क, योगेंद्र यादव, अतुल कुमार अंजान, राजाराम सिंह, जसबीर कौर नट, आशिष मित्तल, डॉ. अशोक ढवळे, आमदार जयंत पाटील, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे आदी संबोधित करणार आहेत.
लखीमपूर येथील शहीद शेतकऱ्यांच्या अस्थिंचे विसर्जन
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या शेतकऱ्यांचे अस्थि कलश महाराष्ट्रात फिरवण्यात आले होते. या अस्थिकलशाचे आज सायंकाळी 'गेट वे ऑफ इंडिया'जवळ विसर्जन करण्यात येणार आहे. महापंचायतीचा समारोप झाल्यानंतर अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha