राडा, राडा...! आजचा दिवस मोठ्या रणधुमाळीचा! सोमय्यांवर हल्ला, राणांना जेल, अन् त्यात पंतप्रधानांचा मुंबई दौरा
Maharashtra Mumbai Latest News Updates : आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आहे भाजप आणि शिवसेनेत काल झालेला भीषण राडा.
Maharashtra Mumbai Latest News Updates : आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आहे भाजप आणि शिवसेनेत काल झालेला भीषण राडा. काल झालेल्या गोंधळानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याआधी राणांनी पंतप्रधानांचा दौरा असल्यानं आंदोलन वापस घेत असल्याचं सांगितलं. मात्र नंतर त्यांना अटक केल्यानं गोंधळ वाढला. भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले आणि तिथं शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात आज पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं भाजप-शिवसेनेतील गोंधळ आणि पंतप्रधानांचा दौरा याकडे आज दिवसभर लक्ष लागून असणार आहे.
राणा दाम्पत्याला अटक, आज कोर्टात हजर करणार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलं आहे.
'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.
किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला, आज काय पडसाद उमटणार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले असून आज दिवसभर यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच कार्यक्रमात
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आज संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित दिसणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 80 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.