(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीचा किरण गोसावीचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती; प्रभाकर साईलवर धक्कादायक आरोप
KP Gosavi Allegation on Prabhakar Sail: पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी किरण गोसावी यांनी केलेला एक व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्यात प्रभाकर साईलनं केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडली आहे.
KP Gosavi Allegation on Prabhakar Sail : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला पंच प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. अशातच साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं (Kiran Gosavi) सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी किरण गोसावी यांनी केलेला एक व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्यात प्रभाकर साईलनं केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडली आहे. या व्हिडीओमध्ये बोलताना किरण गोसावीनं प्रभाकर साईल यांनी त्याच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यानं पंच प्रभाकर साईल यांचा मोबाईल तपासून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
पाहा व्हिडीओ : 'प्रभाकर साईल आणि दोन भावांची चौकशी करा', पोलीस कारवाईआधी Kiran Gosavi यांचा व्हिडीओ 'माझा'कडे
किरण गोसावी व्हिडीओमध्ये म्हणाला की, "नमस्कार मी किरण गोसावी, प्रभाकर साईलनं केलेल्या आरोपांवर बोलणार आहे. जो प्रभाकर साईल सांगतोय की, त्याला इथं उभं केलं होतं, तिथं उभं केलं होतं. खूप पैसे घेतले होते... सॅम डिसूझाबाबतही म्हणतोय... पण सॅम डिसूझाशी कोणाचं बोलणं झालं होतं? सॅम डिसूझाला किती पैसे देण्यात आले? प्रभाकर साईलला कितीची ऑफर मिळाली होती? याची सर्व माहिती प्रभाकरच्या मोबाईलमधून मिळेल." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी माध्यमांना आवाहन करतो की, प्रभाकर आणि त्याच्या दोन भावांचा सीडीआर रिपोर्ट आणि चॅट्स समोर आणा. माझेही चॅट्स समोर आणा."
"माझे आणि प्रभाकर साईलचे काही चॅट माध्यमांसमोर आले आहेत. ज्यामध्ये मी म्हणतोय की, एवढे पैसे घेऊन ये आणि तिथे नेऊन दे. माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यावसाय आहे. ज्यामध्ये माझे अनेक लोकांकडे पैसे उधार आहेत. त्याबाबतच चॅट करण्यात आलं होतं. 2 तारखेनंतर प्रभाकर सैलच्या फोनवरुन कोणाकोणासोबत संवाद साधण्यात आला. तसेच जे चॅट्स डिलीट करण्यात आले, ते सर्व समोर आणावं. हिच माझी विनंती.", असं किरण गोसावी म्हणाला. तसेच आता जेव्हा मुंबई पोलीस याबाबत तपास करत आहे, त्यावेळी प्रभाकरबाबत संपूर्ण माहिती काढण्यात यावी. कोणते मंत्री यामागे आहेत, ती माहिती पोलिसांनी समोर आणावी. माझी फक्त एवढीच मागणी आहे, असंही म्हटलं आहे.
"एक मराठी माणूस असल्यामुळे माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, माझ्या पाठिशी कोणा एका मंत्र्यानं, नेत्यानं मग तो विरोधी पक्षाचा असो वा सत्ताधारी, ठामपणे उभं राहावं आणि मी केलेल्या मागणीबाबत पोलिसांना कारवाईचे आदेश द्यावे. मग सत्य सर्वांसमोर येईल. या प्रभाकरचा फोन ताब्यात घेऊन, तपास करा. सर्व सत्य बाहेर येईल. त्याचा आणि त्याचा भावांचा फोन तपासा सगळं समजेल. याच लोकांनी पैसे खाल्लेत.", असं किरण गोसावी म्हणाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- KP Gosavi Arrested : किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, अटकेची प्रक्रिया सुरु
- Nawab Malik : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस करत लोकांना फसवलं?, नवाब मलिक यांनी दिला पुरावा
- Exclusive: समीर वानखेडे यांच्या बहिणीने नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळले; म्हणाल्या..
- क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला नवे वळण? किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे व्हाट्सअप चॅट 'माझा'च्या हाती
- Sameer Wankhede : आम्हाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर