BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: निवडणुकीसाठी आता वेळ कमी असल्याने दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. जागावाटपाचा निर्णय जाहीर करून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज आहेत.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेसेना आणि मनसेचे कार्यकर्ते ज्याची आतूरतेनं वाट बघतायत तो क्षण जवळ आला आहे. संजय राऊत म्हणतात ते खरं असेल, तर उद्याच ठाकरेंच्या महायुतीची घोषणा होईल. त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठकांचं जोरदार सत्र सुरू होतं. संजय राऊतांपासून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई ही मंडळी मातोश्री आणि शिवतीर्थादरम्यान धावपळ करत होते. यातून दोन्ही पक्षांच्या हाती नेमकं काय लागलंय ते पाहुयात,
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा शब्द पडू द्यायचा नसेल, तर ठाकरे बंधूंना मंगळवारचा सूर्य उगवताच युतीची घोषणा करायला हवी. कारण 23 डिसेंबरपासून, महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात होणार आहे. आता मंगळवारच्या सूर्याला कोणकोणत्या राजकीय घडामोडी पाहायला मिळताहेत हे लवकरच कळेल.
ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि मनसेच्या बाळा नांदगावकरांसाठी सोमवार बऱ्यापैकी दगदगीचा होता. आधी संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. मग बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. तीन एक तासाच्या चर्चेनंतर मनसे नेत्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या घराचा रस्ता धरला. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एवढ्या चकरा माराव्या लागण्याचं कारण म्हणजे काही जागांवरचा तिढा.
शिवडी, दादर, माहीम, भांडुप, विक्रोळी मतदारसंघातील काही जागांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. कारण हे सगळे भाग मराठीबहुल आहेत. या जागांवरून जास्त ताणू नका अशा सूचना राज ठाकरेंनी संजय राऊतांसह स्वतःच्या पक्षातील नेत्यांनाही दिला होता. सोमवारचा सूर्य मावळेस्तोवर शिवडी, दादर आणि माहीममधल्या बहुतांश प्रभागांचा तिढा सोडवण्यात दोन्ही पक्षांना यश आलं होतं. मात्र, भांडुप आणि विक्रोळीवरून रात्री उशीरापर्यंत खलबतं सुरू राहणार असल्याचं कळतंय.
BMC Election 2025 : कुठे अडलं, कुठे सुटलं?
- शिवडीतील 3 जागांवर तिढा होता.
- अखेर 2 जागा ठाकरेंची शिवसेना आणि 1 जागा मनसे लढण्यावर एकमत झालं.
- दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 वरून रस्सीखेच सुरू होती.
- अखेर दोघांनी चर्चेअंती हा तिढा देखील सोडवला.
- मात्र, भांडुप आणि विक्रोळीच्या जागेचा तिढा सोमवारी संध्याकाळपर्यंतही सुटलेला नव्हता.
हातात वेळ कमी आहे... त्यामुळे जे काही मतभेद असतील ते चर्चेनं सोडवण्याशिवाय दोन्ही ठाकरेंकडे काहीच पर्याय नाही. आजार बाजूला ठेवून संजय राऊतांनी प्रत्येक पक्षाशी चर्चा करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली दिसतेय. काँग्रेसनं कितीही वेळा नकारघंटा वाजवली असली तरी, ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला सोबत घेण्याबाबत प्रयत्न सोडलेले नाहीत.
Sanjay Raut Call To Rahul Gandhi : राऊतांचा राहुल गांधींना फोन?
मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत आणि राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. मात्र मुंबई काँग्रेस स्वबळावर लढण्यावर ठाम आहे. आता राहुल गांधी ठाकरेंच्या शिवसेनेच्या शब्दाखातर काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तिकडे ठाकरे बंधूंसोबत येण्यासाठी शरद पवार तयार आहेत, फक्त अट एकच... ती म्हणजे सन्मानजनक जागा मिळण्याची. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबईसाठी ठाकरे बंधूंना 50 जागांचा प्रस्ताव पाठवल्याचं समजतंय. 50 पैकी 30 जागांवर येत्या एक-दोन दिवसात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात बैठक होणार आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधू शक्तिप्रदर्शन करणार
मुंबई महापालिकेत आपली मोट मजबूत असावी यासाठी शेवटच्या क्षणी का होईना, पण ठाकरे बंधूंची धडपड वाढलीय. विरोधकांनी याला नौटंकी म्हणताच संजय राऊतांनी खास त्यांच्या शैलीत पलटवार केला. नाटक नव्हे हा प्रीतिसंगम असं संजय राऊत म्हणाले.
युतीची घोषणा करण्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं समजतंय. हे शक्तिप्रदर्शन कोणत्या स्वरूपात असेल याची सर्वांनाच उत्सुकता असेल. मात्र, या सगळ्यासाठी ठाकरे बंधूंच्या हातात आणि पर्यायानं त्यांच्याकडून ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे त्यांच्या हातात कितपत वेळ उरलाय हाच खरा प्रश्न आहे.
ही बातमी वाचा:























