Thane : 71च्या युद्धतील ऐतिहासिक ठेवा 2 वर्षांपासून कचऱ्यात उभा; महापराक्रमी 'वैजयंता' रणगाड्याची अवहेलना
Thane News : 1971च्या युद्धात शौर्य गाजविणारा महापराक्रमी रणगाडा 'वैजंयता' कळव्याच्या रेतीबंदर जवळ कचऱ्यात ठेवण्यात आला आहे. रंगरंगोटीसाठी काढण्यात आलेला रणगाडा आजपर्यंत पुन्हा बसविण्यात आला नाही.
Thane News : 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजविणारा 'वैजंयता' रणगाडा शहीद मनीष पितांबर यांच्या स्मरणार्थ मुंब्रा स्टेशन जवळच असलेल्या मोकळ्या जागेत बसविण्यात आला होता. मात्र आज तोच महापराक्रमी रणगाडा कळव्याच्या रेतीबंदर जवळ कचऱ्यात ठेवण्यात आला आहे. रंगरंगोटीसाठी काढण्यात आलेला रणगाडा आजपर्यंत पुन्हा बसविण्यात आला नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानं बसविण्यात आलेल्या या रणगाड्याची आज अक्षरशः दुर्दशा झाली आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना युद्धाच्या रणभुमीत शौर्य गाजविणारा 'वैजयंता' रणगाडा शहिद मनीष पितांबरे यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ दिला होता. मुंब्रा स्टेशनजवळ मोकळ्या जागेत हा रणगाडा 19 मे, 2013 रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करून बसवण्यात आला होता. काही वर्षे मुंब्र्याचे आकर्षण असलेला हा रणगाडा, त्यानंतर मात्र गर्दुल्ले आणि भिकारी यांच्या विळख्यात अडकला होता. या रणगाडयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते हवेत विरलं. अखेर हा रणगाडा मुंब्रा स्टेशन परिसरातून 16 ऑगस्ट, 2019 रोजी हटविण्यात आला. तो पुन्हा रंगरंगोटी करून मुंब्रा स्टेशन परिसरात चबुतऱ्याच्या पायऱ्या तोडून काचेत बसविण्यात येणार होता. मात्र दोन वर्ष उलटली तरी त्याकडे कोणाचं लक्ष नाही. सध्या हा रणगाडा रेतीबंदर येथील मोकळ्या भूखंडात ठेवण्यात आला आहे, तो आजपर्यंत धूळखात पडला आहे. सुर्याचं प्रतीक असलेला वैजयंता रणगाडा पुन्हा मुंब्रा स्टेशन परिसरात बसणार कधी? असा सवाल मुंब्रावासी विचारीत आहेत.
ज्यांच्या स्मरणार्थ हा रणगाडा बसविण्यात आला होता. ते मेजर मनीष पितांबरे 2006 साली काश्मीर खोऱ्यात दाहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात शहिद झाले होते. त्यांना नंतर 'कीर्ती चक्रानं' गौरविण्यात आलं होतं. त्यामुळे या रणगाड्यामुळे त्यांच्या स्मृतींना देखील उजाळा मिळत होता. मात्र रणगाडा पुन्हा त्या जागी ठेवलाच गेला नसल्यानं मेजर मनीष पितांबरे यांचा देखील अवमान होत आहे.
तेव्हा आमदार असलेले जितेंद्र आव्हाड आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यांना या ऐतिहासिक ठेव्याचा विसर तर पडला नाही ना? असा प्रश्न ठाणेकर विचारात आहेत. एबीपी माझाच्या बातमीनंतर तरी या रणगाड्याला चांगले दिवस प्राप्त होतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.