Kalyan : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सात वर्षानंतर वाचा फुटली, आरोपीवर गुन्हा दाखल
नातेवाईकाकडे गेलेल्या एका सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी आता तब्बल सात वर्षानंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण : अल्पवयीन मुलीवर तिच्या काकानेच धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना तब्बल सात वर्षानंतर उघड झाली आहे. कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 64 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास तिच्या छोट्या बहिणीवर देखील अत्याचार करण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळेच आजपर्यंत याबद्दल पीडित मुलगी काहीही बोलली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. आता या पीडित मुलीचे वय 14 वर्षं असून मागील सात वर्षापासून ती मानसिक तणावात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सात वर्षांपूर्वी, 2014 साली तिच्या आई वडिलांसोबत तिच्या सदर नातेवाईकाच्या घरी काही दिवसांकरीता राहण्यास गेली होती. तेव्हा आरोपी नातेवाईकाने त्या मुलीवर वारंवार लैगिंक अत्याचार केला होता. तसेच ही गोष्ट अन्य कोणाला सांगितल्यास लहाण बहिणीसोबत देखील लैंगिक अत्याचार करण्याची धमकी आरोपीने संबंधित मुलीला दिली होती. यामुळे पीडीत मुलगी सात वर्षापासून प्रचंड मानसिक दबावाखाली वावरत होती. या प्रकरणामुळे घाबरलेल्या त्या मुलीने या घटनेची माहिती आतापर्यंत कुणालाही दिली नव्हती.
अखेर पुन्हा त्या नातेवाईकाकडे जाण्याची वेळ येताच त्या मुलीने आपल्या आईला या आधी घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकल्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांना धक्का बसला. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसात त्या नराधम काका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी 64 वर्षीय आरोपीला अटक केल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :