एक्स्प्लोर
'राम मंदिराचं नंतर बघा, आधी पत्री पूल बांधा'; मनसेचं कल्याणमध्ये आंदोलन
धोकादायक बनलेला कल्याणचा पत्री पूल सप्टेंबर महिनाअखेरपासून पाडायला सुरुवात करण्यात आली होती. दीड महिन्यात हा पूल पूर्ण पाडून त्याजागी पुढच्या तीन महिन्यात नवीन पूल उभारण्याचं आश्वासन एमएसआरडीसीने दिलं होतं.

कल्याण : "राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा," अशी उपरोधिक टीका मनसेने केली. कल्याणच्या पत्री पुलाचं काम संथगतीने चाललं असल्याचा आरोप करत मनसेने आज ठिय्या आंदोलन केलं. त्यावेळी मनसेने सरकारविरोधात अशी घोषणाबाजी केली. पत्री पुलाच्या कामामुळे कल्याण-डोंबिवलीकर वाहतूक कोंडीने त्रस्त झाले असून त्यांची या त्रासातून सुटका करण्याची मागणी मनसेने केली आहे. धोकादायक बनलेला कल्याणचा पत्री पूल सप्टेंबर महिनाअखेरपासून पाडायला सुरुवात करण्यात आली होती. दीड महिन्यात हा पूल पूर्ण पाडून त्याजागी पुढच्या तीन महिन्यात नवीन पूल उभारण्याचं आश्वासन एमएसआरडीसीने दिलं होतं. मात्र आता दीड महिना होत आला, तरी पत्री पुलाचं पाडकाम झालेलं नसून काम अतिशय संथगतीने सुरु आहे. यामुळे बाजूच्या एकाच पुलावरुन दुहेरी वाहतूक होत असल्याने नेहमीच मोठी वाहतूक होत असते. मनसेने याविरोधात आज जुन्या पत्री पुलावरच ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात मनसेचे शेकडो कार्यकर्ते काळे कपडे घालून सहभागी झाले होते. यावेळी "राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा," अशी उपरोधिक टीका मनसेने केली. राज्य सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, केडीएमसी यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पत्री पुलाच्या कामाला गती न मिळाल्यास यापुढचं आंदोलन उग्र स्वरुपाचं असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आणखी वाचा























