KDMC : ठेकेदाराने केडीएमसीला लावला 20 कोटीचा चुना, बीओटी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
KDMC : या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन पालिकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत संबधित कंत्राटदाराविरोधात पालिका प्रशासनाने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या उद्देशाने 2005 साली सुरु केलेल्या बीओटी प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याचं दिसून आलंय. त्यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयाचा चुराडा झालाय. या प्रकल्पाचा नागरिकांना प्रत्यक्षात कोणताच लाभ झालेला नाही. त्यातच ट्रक टर्मिनस आणि पार्किंग प्लाझा या प्रकल्पासाठी असलेल्या आरक्षित जागेचा खोट्या कागदपत्राच्या आधारे गैरवापर करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप करत संबधित कंत्राटदाराविरोधात पालिका प्रशासनाने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पालिकेचे 20 कोटी 69 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत ठेकेदार एसएस असोसीएटसचे संचालक मथ्यू जॉन कुचीन, अनिल शहा आणि सीमा शहा यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' अर्थात बीओटी तत्वावर 2005 साली कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेत दुर्गामाता चौक येथे ट्रक टर्मिनस व पार्किंग प्लाझा, वाडेघर येथे स्पोर्ट्स क्लब, विट्ठलवाडी पूर्वेकडे व्यापारी संकुल आणि भाजी मंडई, लालचौकी येथे कम्युनिटी सेंटर, डोंबिवली क्रीडांगणावर बांधण्यात आलेला मॉल, आधारवाडी येथे मॉल कम मल्टिप्लेक्स प्रकल्प, रूक्मिणीबाई रुग्णालयाशेजारी मॉल यासारख्या बहुद्देशीय प्रकल्पांचा समावेश होता. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबधित ठेकेदारांना 36 महीन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र या सर्वच प्रकल्पाचा बोजवारा उडाला असून अद्याप एकही प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही.
मोक्याच्या भूखंडाची मलई ठेकेदार मागील 16 वर्षापासून लाटत आहेत. कल्याण पश्चिमेकडील दुर्गामाता चौकात प्रस्तावत करण्यात आलेल्या ट्रक टर्मिनस आणि पार्किंग प्लाझासाठी पालिकेचा आरक्षित भूखंड ठेकेदाराला 20 वर्षांच्या लीजवर देण्यात आला होता. त्यानंतर महासभेची रीतसर परवानगी न घेताच तत्कालीन अधिकाऱ्यांनी या लीजची मुदत 60 वर्षांपर्यत वाढवली. मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले होते.
ठेकेदाराकडून हा भूखंड खोट्या कागदपत्राच्या आधारे ताब्यात घेत पालिकेची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. संबधित संचालकांनी एसएस असोसीएटस या दोन संस्थाच्या नावातील साधर्म्यचा फायदा घेत नियमबाह्य करारनामे करत या प्रकल्पाच्या जागेवर कर्ज घेत या जागेवर थर्ड पार्टी हक्क निर्माण केला. तर पालिकेचे 20 कोटी 69 लाख 69 हजार 585 इतके भाडे थकवले आहे, इतकेच नव्हे तर पालिकेविरोधातच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पालिकेची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी महापालिकेच्या वतीने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- UP Assembly Elections : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री, 403 जागांवर लढवणार निवडणूक
- Gujarat Chief Minister : भाजपची आज महत्वाची बैठक, मुख्यमंत्रीपदासाठी 'हे' नाव आघाडीवर
- Long Validity Pre Paid Plans : Airtel, Vi, Jio चे दीर्घ व्हॅलिडिटी प्रीपेड प्लान; कोणाचा रिचार्ज प्लान बेस्ट?