INS Vikrant निधी अपहार प्रकरण: नील सोमय्यांनाही दिलासा, हायकोर्टाने पोलिसांना दिले 'हे' निर्देश
INS Vikrant Case : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याप्रमाणे नील सोमय्या यांनाही हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेल्या निधीत अपहार केल्याचा त्यांचा दावा आहे.
INS Vikrant Case : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. 28 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत सोमय्या पितापुत्रांना अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. यादरम्यान त्यांना अटक झाल्यास नील सोमय्या यांचीही 50 हजारांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं जारी केले आहेत. तसेच 25 ते 28 एप्रिल असे सलग चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत त्यांना चौकशीकरता आर्थिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजेरी लावणं नील सोमय्यांसाठी बंधनकारक राहील असे निर्देश न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी आपल्या निकालात दिले आहेत. सन 2013 मधील प्रकरणी वर्ष 2022 पर्यंत कोणतीच तक्रार नव्हती. तसेच या मदतनिधीतून जो 57 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय, त्याचे कोणतेही पुरावे सध्या उपलब्ध नाहीत या गोष्टी केवळ माध्यमांतील बातम्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे हा तपासाचा मुद्दा आहे हे मान्य करत आम्ही आरोपीला तपासाकरता हजर राहण्याचे निर्देश जारी करत आहोत असं हायकोर्टानं आपल्या निकालांत स्पष्ट केलंय. आपण पोलिसांना याप्रकरणी तपासांत पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत अशी भूमिका नील सोमय्यांच्यावतीनं ऋषिकेश मुंदरगी यांनी हायकोर्टात मांडली. तर राज्य सरकारच्यावतीनं विशेष सरकारी वकील शिरीष गुप्ते यांनी याचिकेला विरोध केला नाही. .
काय आहे प्रकरण ?
माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गून्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार त्यानं दिलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केली होती. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अश्या विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता. ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकत होते. यातनं केवळ 11 हजार 224 रूपयांचा निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हाजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे, तेव्हा त्यांच्या हेतूवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला?, त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का?, याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.
सोमय्याचा बचावासाठी युक्तिवाद ?
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या दोन पक्षा मोठा राजकिय वाद सुरूय. त्यामुळेच या दोन पक्षांतील नातेसंबंध खराब झालेत, हे जगजाहीरय आणि म्हणूनच हे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत हे काही वेगळं सांगायला नको. तसेच साल 2013-14 मध्ये गोळा केलेल्या वर्गणीची साल 2022 मध्ये पावती मागणं यावरून तक्रारदाराच्या हेतूवरही सवाल निर्माण होतो असं ही ते म्हणाले. याशिवाय हा मदतनिधी 57 कोटींचा होता असा जर दावा करण्यात येत असेल तर जर रस्त्यांवर उभं राहून इतका निधी गोळा होऊ शकतो का?, असा सवाल उपस्थित करत आपण केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा केला होता असा खुलासा सोमय्या यांच्यावतीनं कोर्टात केला गेला आहे. किरीट सोमय्यांनी वारंवार महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांनिशी आरोप केले आहेत. त्यानंतर पलटवार करताना "बापबेटा जेल जाएंगे", या आशयाची विधानं गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. त्याच दबावाखाली हा गुन्हा दाखल झालाय असा आरोपही सोमय्यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला आहे.