मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्याचे संकेत
महापारेषण विभागातर्फे या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून शनिवारपर्यंत आम्ही आपला अहवाल सादर करू असे महापारेषणच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर बोलताना मंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
![मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्याचे संकेत inquiry committee appointed by the state government over the power outage in Mumbai energy minister nitin raut मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्याचे संकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/15210901/nitin-raut.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई आणि एमएमआर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्यावरून ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या समितीला आठवडाभरात आपला अहवाल द्यायला सांगण्यात आले आहे.
मुंबईत भविष्यात असा वीज ठप्प होण्याचा प्रकार होऊ नये यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आयलँडिंग यंत्रणेची नवी डिझाइन तयार करा अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी केली. ऊर्जा मंत्री डॉ राऊत यांनी आज प्रकाशगड या ऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुंबईतील वीज ठप्प होण्यावर सखोल चर्चा केली. या बैठकीला महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक उपस्थित होते. महापारेषण विभागातर्फे या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून शनिवारपर्यंत आम्ही आपला अहवाल सादर करू असे महापारेषणच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर बोलताना मंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
"1981 पासून राज्यात लागू करण्यात आलेली आयलँडिंग यंत्रणा ही मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सोयीसाठी उभारण्यात आली का? 1981 च्या तुलनेत आज लोकसंख्या वाढली, तंत्रज्ञान बदलले आणि वीज निर्मितीही वाढली. मग या यंत्रणेत गेल्या 40 वर्षात काय बदल केले गेले? जगातील प्रमुख महानगरामध्ये आयलँडिंग यंत्रणा कशी काम करते? त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो? याचा आजवर तुम्ही काही अभ्यास केला का? हा प्रश्न लगेच उद्भवू नये म्हणून आणि भविष्यात 30 वर्षात उद्भवू नये म्हणून कोणत्या योजना तुम्ही आखल्या?," असे प्रश्नच त्यांनी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले.
या सर्व प्रश्नांची उत्तरे अंतर्गत चौकशी अहवालात शनिवारपर्यंत मला हवी आहेत आणि गुरुवारी आपण यावर पुन्हा बैठक घेऊन चर्चा करु, असेही ते म्हणाले."तुम्ही जबाबदारी फिक्स करा नाहीतर मी जबाबदारी फिक्स करून कारवाई करेल,"असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.
राज्यात वीज पारेषण क्षेत्रात एस एल डी सी (State Load Dispatching Centre) ची भूमिका महत्वाची आहे. "या केंद्राने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली का? टाटा कंपनी म्हणतेय की त्यांना वीज पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असल्याने एसएलडीसीने आयलँडिंग करण्याची पूर्वसूचना त्यांना दिली नाही. एसएलडीसी म्हणत आहे की, त्यांनी आधीच कळविले. ज्या अधिकाऱ्याने टाटाला एस एम एस पाठवून कळविले त्याचा मोबाईल बघायचा आहे.त्याने नेमके किती वाजता एस एम एस पाठविला हे बघायचे आहे. या प्रकरणी सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे आहे," अशा शब्दांत राऊत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
Mumbai Power Outage | वीज पुरवठा खंडीत होण्यामागे घातपाताची शक्यता : ऊर्जामंत्री नितीन राऊतमहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)