(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदा हापूसचा दुष्काळ, आवक निम्म्याने घटल्याने दर वाढले
दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये 50 ते 60 हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक होते. मात्र सध्या ही आवक 25 ते 30 हजार पेटींवर आली आहे. शेतकरी वर्गाबरोबर ग्राहकांनाही याचा फटका बसला आहे.
नवी मुंबई : आंबे आवडत नाही अशी माणसं भारतात कमीच आढळतील. मात्र महाराष्ट्रातील हापूस प्रेमींसाठी यंदा निराशजनक बातमी आहे. कारण हापूस आंब्याची मार्चमध्ये होणारी आवक तुलनेने यावर्षी कमी झाली आहे.
उन्हाळयात सर्वांना कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याचे वेध लागतात. एपीएमसी मार्केटमध्ये मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात हापूस आंब्यांची आवक होते. मात्र यावर्षी हापूस आंब्याचा दुष्काळ असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.डिंसेबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोकणात थंडीचा कडाका वाढल्याचा परिणाम आंबा पिकावर झाला होता. अती थंडीमुळे आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर गळून पडला. तर दुसरीकडे थ्रीप्स सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. याचा फटका हापूस आंबा उत्पादनाला बसला त्यामुळे हापूसचं उत्पादन 50 टक्क्यांनी घटलं.
दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये 50 ते 60 हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक होते. मात्र सध्या ही आवक 25 ते 30 हजार पेटींवर आली आहे. शेतकरी वर्गाबरोबर ग्राहकांनाही याचा फटका बसला आहे.
सध्या हापूस आंब्याची 4 डझनाची पेटी 1500 ते 3000 रुपयांना विकली जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील आंब्याची आवक कमीच राहणार असल्याने आंब्याचे दर कमी होतील याची शक्यता फार कमी आहे.